Per Capita Income: वर्ष 2030 पर्यंत तब्बल 70% वाढेल भारतीयांची कमाई; 3,29,051 असेल दरडोई उत्पन्न- Reports

अहवालानुसार, दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत तेलंगणा राज्य 2.75 लाख रुपयांसह पहिल्या स्थानावर आहे. यानंतर कर्नाटक 2.65 लाख, तामिळनाडू 2.41 लाख, केरळ 2.30 लाख आणि आंध्र प्रदेश 2.07 लाख रुपये यांचा क्रमांक लागतो.

Per Capita Income: वर्ष 2030 पर्यंत तब्बल 70% वाढेल भारतीयांची कमाई; 3,29,051 असेल दरडोई उत्पन्न- Reports
Money प्रतिकात्मक फोटो (Photo Credits PTI)

भारत सध्या जगातील सर्व वित्तीय संस्थांचा केंद्रबिंदू बनत चालला आहे. अशात जगातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या स्टँडर्ड चार्टर्डने देशाच्या दरडोई उत्पन्नाबाबत (Per Capita Income) एक अहवाल जारी केला आहे. भारताचे दरडोई उत्पन्न 2030 पर्यंत सुमारे 70 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या संशोधन अहवालात असे म्हटले आहे की, दरडोई उत्पन्न हे सध्याच्या $2,450 वरून 2030 पर्यंत $4,000 पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

संशोधनात असे म्हटले आहे की, उत्पन्नातील वाढीमुळे देशाला $6 ट्रिलियनच्या जीडीपीसह मध्यम-उत्पन्न असलेली अर्थव्यवस्था बनण्यास मदत होईल आणि यातील निम्मा वाटा देशांतर्गत वापरातून येईल.

साधारण 2001 पासून दरडोई उत्पन्नात विक्रमी वाढ झाली आहे. 2001 मध्ये ते $460 होते, जे 2011 मध्ये $1,413 आणि 2021 मध्ये $2,150 पर्यंत वाढले. बाह्य व्यापारामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला जास्तीत जास्त गती मिळेल, असे या अहवालात म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षात हा व्यापार $1.2 ट्रिलियन वरून 2030 पर्यंत जवळजवळ दुप्पट $2.1 ट्रिलियन पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. जीडीपीमध्ये 10 टक्के वाढीचा अंदाजही अहवालात व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये, देशांतर्गत वापर $2.1 ट्रिलियन होता, जो जीडीपीच्या सुमारे 57 टक्के आहे. (हेही वाचा: EPF E-Nomination: ईपीएफ ई-नामांकन कसे करावे? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस)

अहवालानुसार, दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत तेलंगणा राज्य 2.75 लाख रुपयांसह पहिल्या स्थानावर आहे. यानंतर कर्नाटक 2.65 लाख, तामिळनाडू 2.41 लाख, केरळ 2.30 लाख आणि आंध्र प्रदेश 2.07 लाख रुपये यांचा क्रमांक लागतो. त्याचवेळी, अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2030 पर्यंत या क्रमवारीत बदल होऊ शकतो, ज्यामध्ये गुजरात अव्वल क्रमांकावर येऊ शकतो. यानंतर महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, हरियाणा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश असतील. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच सांगितले की, त्यांच्या पुढील कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्था टॉप 3 मध्ये आणली जाईल आणि ती 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल. जपान ही सध्या अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2023 06:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).