Online Fraud: चीनी नागरिकांकडून 5 लाख भारतीयांची 150 कोटींची फसवणूक; दिल्ली पोलिसांनी केला पर्दाफाश
Online Fraud | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) चीनमधील (Chine) आस्थापनांद्वारे अ‍ॅप्सच्या माध्यमातून मनी लाँड्रिंगसारख्या सर्वात मोठ्या आर्थिक फसवणूकीचा (Online Fraud) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन सीए, एक तिबेटी महिला आणि इतर आठ जणांना अटक केली आहे. पोलिस आयुक्त एस.एन. श्रीवास्तव म्हणाले की, 'गुंतवणूकी'च्या नावाखाली सुमारे पाच लाख भारतीयांची फसवणूक झाली आहे, तसेच 'इन्स्टंट कमाई' प्रकारच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे भारतीयांचा संवेदनशील डेटादेखील प्राप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की या मल्टी लेव्हल मार्केटिंग मोहिमेद्वारे दोन महिन्यांत चिनी लोकांनी भारतीयांच्या दीडशे कोटी रुपयांना चुना लावला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील अनेक बँकांमध्ये पेमेंट गेटवेमध्ये 11 कोटी रुपये रोखले गेले आहेत, यासह गुरुग्राममधील सीएकडून पोलिसांनी 97 लाखांची रोकड जप्त केली आहे. या सीएने फसवणूक करणाऱ्या चीनी नागरिकांना 110 हून अधिक कंपन्या बनवण्यास मदत केली होती. पोलिसांनी सांगितले की, हे लोक गुंतवणूकीवर उत्तम परताव्याचे आमिष दाखवून लोकांना त्यांच्या जाळ्यात ओढत असत, जसे की 24 ते 35 दिवसांत गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट पैसे देतो.

हे लोक अशा योजना चालवत होते, ज्यामध्ये तास आणि दिवसांवरही रिटर्न मिळत असे. एक व्यक्ती 300 रुपये ते कित्येक लाखात गुंतवणूक करू शकत होती. यातील एक अ‍ॅप पॉवर बँक आणि दुसरा अलीकडेच गूगल प्ले स्टोअरवर 4 क्रमांकावर ट्रेंड करीत होता. जेव्हा या दोन्ही अॅप्सचे सर्व्हर तपासले गेले, तेव्हा ते सर्व्हर चीनमध्ये असल्याचे आढळले. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातील त्यांना परतावा दिला जात असे, मात्र नंतर त्यांची फसवून केली जात असे. (हेही वाचा: CoWIN Portal द्वारे 'या' कारणांनी होत आहेत युजर्स ब्लॉक; अकाऊंट कसे कराल Unblock? जाणून घ्या)

चिनी फसवणूक करणारे लोक बनावट व्हॉट्सअ‍ॅप व टेलिग्रामद्वारे लोकांना कॉल करीत असत आणि बनावट बँक खात्यांद्वारे इच्छुक लोकांना जाळ्यात ओढत असत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मोठ्या संख्येने फसवणूक करणार्‍यांकडून वापरल्या जाणार्‍या अ‍ॅप्समध्ये Power Bank, EZPlan आणि  SunFactory यांचा समावेश होता. यातील बरेच अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअरवर देखील सूचीबद्ध आहेत. या सर्व अॅप्सची जाहिरात यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल व व्हॉट्सअॅप चॅटच्या माध्यमातून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. एकदा वापरकर्त्याने नोंदणी केली की, त्याला मोठ्या परताव्यासाठी वारंवार पैसे गुंतविण्यास सांगितले जात असे.