आता टाटा, अदानी आणि ह्युंदाईसह (Tata, Adani and Hyundai) अनेक खाजगी कंपन्यांच्या ट्रेन्स (Private Trains) लवकरच देशाच्या रेल्वे रुळावर धावणार आहेत. म्हणजेच आता या दिग्गज कंपन्या भारतातील रेल्वे सांभाळणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यटन स्थळांना चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी, तेजस एक्स्प्रेससारख्या अधिक खासगी गाड्या चालवण्याची घोषणा केली होती. सरकारला देशभरातील विविध मार्गांवर 150 खासगी गाड्या चालवायच्या आहेत. यासाठी आता दोन डझनहून अधिक कंपन्यांनी खासगी रेल्वे गाड्यांमध्ये रस दाखविला आहे.
टाटा रियल्टी, हिटाची इंडिया, साउथ एशिया, एस्सेल ग्रुप, अदानी पोर्ट आणि एसईझेड या देशांतर्गत कंपन्यांनी खासगी गाड्या चालवण्यास रस दर्शविला आहे. ग्लोबल प्लेयर Alstom ट्रान्सपोर्ट, Bombardier, Siemens AG, ह्युंदाई, मारक्युअर या कंपन्याही खासगी गाड्या चालवण्यास उत्सुक आहेत.
भारतीय रेल्वेने 100 मार्गावर सुमारे 150 खासगी गाड्या चालवण्याची योजना तयार केली आहे. यात मुंबई-दिल्ली, चेन्नई-दिल्ली, नवी दिल्ली-हावडा, शालीमार-पुणे, नवी दिल्ली-पाटणा अशा मार्गांचा समावेश आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये किमान 16 डबे असतील. या गाड्यांची कमाल वेग ताशी 160 किमी आहे. सन 2020 च्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात आला आह. यासाठी नवीन रेल्वे मार्गांवर 12 हजार कोटी रुपये, सिग्नलिंग व टेलिकॉमवर 1,650 कोटी रुपये आणि इतर पायाभूत सुविधांवर 2,950 कोटी रुपये खर्च केले जातील.
(हेही वाचा: Tejas Express मध्ये 'रेल होस्टेस'सोबत प्रवाशांची गैरवर्तणूक; तक्रार केल्यावर केले निलंबित)
या खास मार्गांवर किती भाडे आकारायचे ते ठरविण्याचा निर्णय खासगी संस्थांकडे असेल. या व्यतिरिक्त संबंधित कंपन्यांना त्या गाड्या चालविण्याचे आणि देखभाल करण्याचे आर्थिक अधिकार असतील. दरम्यान, जेव्हा आयआरसीटीसीने आयपीओद्वारे शेअर बाजारात प्रवेश केला होता, तेव्हा कंपनीचे समभाग 15 दिवसांपेक्षा कमी कालावधीत 50 टक्क्यांहून अधिक वाढले होते. याच कारणांमुळे आता अनेक देशी विदेशी कंपन्या भारतातील रेलेव मार्गांवर खासगी रेल्वे चालवण्यास उत्सुक आहेत.