Tejas Express मध्ये 'रेल होस्टेस'सोबत प्रवाशांची गैरवर्तणूक; तक्रार केल्यावर केले निलंबित  
तेजस एक्स्प्रेस रेल होस्टेस (संग्रहित संपादित प्रतिमा)

दिल्ली ते लखनऊ दरम्यान लक्झरी अशी तेजस एक्स्प्रेस (Tejas Express) धावत आहे. आयआरसीटीसीच्या बॅनरखाली खाजगी-सार्वजनिक भागीदारी अंतर्गत ही देशातील पहिली गाडी आहे. यामध्ये जागतिक स्तरावरील सुविधा मिळतील असे सांगून ट्रेनचे ब्रँडिंग करण्यात आले. ट्रेन वेगवान आहे, विमानातील सुविधा यामध्ये उपलब्ध आहे, ट्रेन इतरही  सोयींनी यूक्त आहे. मात्र आता या ट्रेनबद्दल अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत ज्या वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तर ही गोष्ट आहे इथल्या रेल होस्टेसची (Train Hostess). या रेल्वेमधील रेल होस्टेसनी तक्रार होती की प्रवाशी त्यांच्या गैरवर्तणूक करतात, जबरदस्तीने सेल्फी काढणे, त्यांचे व्हिडीओ बनवणे अशा अनेक गोष्टी या ट्रेनमध्य चालू आहेत.

या गोष्टी इथेच थांबल्या नाहीत, तर या कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने 18 तास काम करायला भाग पाडले जात आहे. तसेच ठरल्यापेक्षा पगारही कमी दिला जात आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्याचे प्रकारही इथे घडले आहेत. नुकतेच तेजस एक्स्प्रेसमध्ये रेल होस्टेस तैनात करणार्‍या वृंदावन फूड्स या कंपनीने 18 ट्रेन होस्टसेसची सेवा बंद केली आहे. आगाऊ सूचना न देता ही सेवा संपुष्टात आणली गेली. याबाबत या रेल्वे परिचारिकांनी सीआरबी विनोद यादव आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. (हेही वाचा: तेजस एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता सामानाचा बोझा उचलावा लागणार नाही)

अनेकदा प्रवासी फक्त या होस्टेसना पाहण्यासाठी त्यांना बोलावून घेतात, त्यांच्यासोबत अघळपघळ बोलायचा प्रयत्न करतात, अशा गोष्टींना या रेल होस्टेस कंटाळल्या आहेत. ट्रेनची परिचारिका अवंतिका म्हणाली की 'त्यांच्यावर अन्याय होत होता, याबाबत तक्रारी केल्यामुळेच आम्हाला कामावरून काढून टाकले आहे.' 4 ऑक्टोबरला ही ट्रेन सुरु झाली होती, व 4 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे 1 महिन्यात तब्बल 20 लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.