निर्भया बलात्कार प्रकरणातील (Nirbhaya Gangrape & Murder Case) चारही दोषींना आज, 20 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता फाशी देण्यात आली. तिहार जेल मधील डॉक्टरांनी 6. 02 वाजता या चौघांनाही मृत घोषित केले तर आता हे चारही मृतदेह स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आले आहेत. दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात या मृतदेहांचे पोस्टमार्टम होणार आहे. तब्बल सात वर्षांनी निर्भयाला आज न्याय मिळाल्याने देशभरात आनंद व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात कायदेशीर पळवाटा शोधून दोषींकडून दाखवण्यात आलेल्या मुजोरीमुळे व परिणामी झालेल्या दिरंगाईमुळे मागील सात वर्ष हे प्रकरण चांगलेच गाजले होते. अनेक प्रसंगी या चारही दोषींनी न्यायालयाला भुलवण्याचा प्रयत्न केला होता त्यासाठी विविध याचिकांचा वापर केला होता, मात्र आज जेव्हा फाशी अटळ आहे हे त्यांना उमगले तेव्हा मात्र त्यांचे चांगलेच धाबे दणाणले होते. फाशीपूर्वी जवळपास अर्धा तास हे चौघेही रडून, जमिनीवर लोळून आपल्या बचावासाठी प्रयत्न करत होते. फासावर लट्कवण्या आधीची परिस्थिती आणि या चारही दोषींची शेवटची इच्छा काय होती हे आता आपण पाहणार आहोत.
निर्भयाला न्याय मिळाला! दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार ही दोषींना तिहार जेल मध्ये फाशी
निर्भयाच्या दोषींची शेवटची इच्छा
निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना आज फाशीपूर्वी त्यांची शेवटची इच्छा विचारण्यात आली होती, ज्यावर त्यांनी पूजा करायची आहे असे सांगितले होते. यानुसार पहाटे 4 वाजता रीतसर भटजींना बोलावून या चारही दोषींच्या हस्ते पूजा केली गेली. त्यांनंतर पाच वाजून 30 मिनिटांनी त्यांना फासावर लटकवण्यात आले.
तिहार जेल मधील फाशी पूर्वीची 30 मिनिटे
माध्यमांच्या माहितीनुसार,पहाटे 3.15 वाजता चौघांना उठवण्यात आले, त्यांच्यातील कोणीही झोपलं नव्हतं. त्यांना आंघोळ करण्यास सांगण्यात आले. नंतर, चहा आणि नाष्टा करायला देण्यात आले. चौघांच्या शेवटच्या इच्छेनुसार चौघांसाठी भटजी बोलावून 4 वाजता पूजा करण्यात आली. तुरुंगातून बाहेर काढण्याआधी चौघांनाही पांढरे कपडे आणि तोंडाला कला कपडा बांधण्यात आला. चौघांचे हात बांधण्यात आले, यावेळी एक जण इतका घाबरला कि चक्क तो जमीनीवर गडाबडा लोळून माफी मागायला लागला. यांनतर फाशी घरात नेऊन आवश्यक ती कारवाई करण्यात आली व त्यांनतर ठीक 5 वाजून 30 मिनिटांनी मुकेश कुमार सिंह, पवन कुमार गुप्त , अक्षय कुमार ठाकूर, आणि विनय शर्मा या चारही दोषींना एकत्र फासावर लटकवण्यात आले. त्यासाठी तिहारच्या तुरुंगाच्या क्रमांक तीनच्या फाशी घरात सोय करण्यात आली होती. पवन जल्लादच्या हातून लिव्हर ओढून या चौघांनाही फाशी दिली गेली.
दरम्यान, निर्भयाच्या दोषींना फाशी मिळताच तिहार जेल बाहेर जमलेल्या दिल्ली वासियांनी जोरदार सेलिब्रेशन सुरु केले. निर्भयाच्या आईने सुद्धा आपल्या लेकीला न्याय मिळाला याचे समाधान व्यक्त केले.
Nirbhaya Case Convicts Hanged:दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार ही दोषींना तिहार जेल मध्ये फाशी : Watch Video
आजचा दिवस देशातील सर्व मुलींसाठी सुरक्षेचा किरण घेऊन आला आहे, ही एक नवी पहाट आहे यापुढे देशातील कोणत्याच मुलीला निर्भयासारखा लढा द्यावा लागणार नाही यासाठी काम करणार आहोत असेही निर्भयाच्या आई आशा देवी यांनी सांगितले.