Nirbhaya Case Convicts Hanged: निर्भयाला न्याय मिळाला! दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार ही दोषींना तिहार जेल मध्ये फाशी
Nirbhaya Case Convicts (Photo Credits: File Image)

निर्भया बलात्कार प्रकरणातील (Nirbhaya Gangrape Case) चारही दोषी, मुकेश कुमार (Mukesh Kumar), पवन कुमार गुप्ता (Pawan Kumar Gupta) , विनय कुमार (Vinay Kumar) आणि अक्षय सिंह (Akshay Singh) यांना आज 20 मार्च रोजी सकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी तिहार जेल (Tihar Jail) मध्ये फाशी देण्यात आली आहे. 2012 दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील हे चारही दोषी मागील 7 वर्षांपासून सतत वेगवेगळ्या कायदेशीर कारणाने फाशी लांबणीवर टाकण्यात यशस्वी होत होते, मागील काही महिन्यातच या चौघांना देण्यात येणारी फाशी तब्बल तीन वेळा पुढे ढकलण्यात आली. मात्र यावेळेस सर्व पळवाटा बंद करून कोर्टाकडून या चौघांना फासावर चढवण्याचे आदेश दिले गेले होते. ज्यानुसार आज त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.

ANI ट्विट

काय होते निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण?

दिल्ली येथे 16 डिसेंबर 2012 च्या रात्री 23 वर्षीय तरुणी निर्भया हिच्यावर सहा जणांकडून अत्यंत निर्दयी पणे सामूहिक बलात्कार झाला होता. नग्नावस्थेत या तरुणीला रस्त्यावर फेकून देण्यात आले. निर्भया पॅरामेडिकलची विद्यार्थीनी होती. या घटनेनंतर तिने मृत्यूशी कडवी झुंज दिली होती, काही दिवस दिल्लीत उपचार घेतल्यावर पुन्हा तिला सिंगापूर मध्ये नेण्यात आले होते. मात्र 13 दिवसानंतर 29 डिसेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाने सर्व देश हादरून निघाला होता. याप्रकरणी 31 ऑगस्ट 2013 रोजी 6 आरोपी कोर्टात दोषी ठरले.या 6 पैकी एक अल्पवयीन असल्याने त्याला बाल सुधारगृहात पाठण्यात आले. तर एका दोषीला तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. इतर चार दोषी- पवन, मुकेश, अक्षय आणि विनय यांच्या विरोधात चौथ्यांदा डेथ वारंट जारी झाले आहे.

यापूर्वी या चौघांना 22 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी फाशी देणार असल्याची निश्चिती झाली होती मात्र प्रत्येक वेळेस याचिकांच्या मार्फत या चौघांनी आपली फाशी टाळली होती, काही दिवसनापूर्वी याच चौघांनी आतंरराष्ट्रीय न्यायालयात सुद्धा धाव घेतली होती. फाशीऐवजी आपल्याला जन्मठेप दिली जावी असे या चौघांचे म्हणणे होते मात्र न्यायालायने मृत्युदंडाची शिक्षा कायम ठेवली आणि अखेरीस आज निर्भयला न्याय मिळाला.

दरम्यान, काल या चौघांना आपापल्या कुटुंबाची भेट घेऊ देण्यात आली होती.  काल कोर्टात अक्षय च्या पत्नीने निर्भयाची आई आशादेवी यांचे पाय पकडून आपल्या नवऱ्याची फाशी रोखा अशी विनंती केली. मात्र पटियाला कोर्टाकडुन  फाशी कायम ठेवण्यात आली, यानुसार आज सकाळी  पवन जल्लाद यांच्याकडून चौघांना फाशी देण्यात आली. तब्बल 7  वर्षे, 3  महिने आणि 3  दिवसांनंतर निर्भया बलात्कार पीडितेला न्याय मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे तर निर्भयाची आई आशा देवी यांनी न्यायलायचे आभार मानले आहेत.