चिंताजनक! Andhra Pradesh मध्ये सापडला Covid-19 चा नवा स्ट्रेन; पूर्वीच्या व्हेरिएंटपेक्षा 15 पट अधिक धोकादायक- Report  
Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

देशातील कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेमध्ये आणखी एक भयानक बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) कोरोना विषाणूचा एक नवीन स्ट्रेन सापडला आहे, जो इतर स्ट्रेनपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याचे म्हटले जात आहे. हा स्ट्रेन आंध्र प्रदेशात सापडला असल्याने त्याला एपी स्ट्रेन संबोधले जात आहे. मात्र, वैज्ञानिक भाषेत याला N440K व्हेरिएंट असे म्हणतात. हैदराबादस्थित सेंटर फॉर सेल्युलर अणि मॉलिक्यूलर बायोलॉजी (CCMB) च्या वैज्ञानिकांनी हा स्ट्रेन शोधला आहे. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, हा नवीन प्रकार भारतातील सद्यस्थितीत असणाऱ्या प्रकारापेक्षा 15 पट अधिक धोकादायक आहे.

दक्षिण भारतात आतापर्यंत कोरोनाचे 5 व्हेरिएंट सापडले आहेत. यापैकी आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये एपी स्ट्रेनचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे. सीसीएमबीचे माजी संचालक राकेश मिश्रा यांचे म्हणणे आहे की, डबल म्यूटंटमुळे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये यावेळी जास्त रुग्ण आढळले आहेत. यावर्षी सापडलेले सुमारे 5000 व्हेरिएंट तपासून सीसीएमबीने असा निष्कर्ष काढला आहे की, N440K इतर प्रकारांपेक्षा वेगाने पसरत आहे.

पूर्वीच्या स्ट्रेनमुळे लोकांची स्थिती बिघडण्यास साधारण एक आठवडा लागत असे,  परंतु हा नवीन स्ट्रेन लोकांवर अवघ्या तीन ते चार दिवसातच परिणाम करत आहे म्हणून हा अधिक धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. अशा लोकांमध्ये ऑक्सिजनचा अभाव दिसून येत आहे. हा यामुळेही धोकादायक आहे कारण तो तरूण लोक तसेच उत्तम प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांवर हल्ला करीत आहे. (हेही वाचा: Supreme Court On Oxygen Shortage: मुंबईकडून काहीतरी शिका! दिल्लीच्या ऑक्सिजन तुटवड्यावरुन सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सल्ला)

नवीन प्रकारात संक्रमित रूग्ण 3-4 दिवसात हायपोक्सिया किंवा डिस्प्नियाला बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत, रुग्णाच्या फुफ्फुसांपर्यंत श्वास पोहोचणे थांबते. योग्य वेळी उपचार आणि ऑक्सिजन सपोर्ट मिळाला नाही तर, रुग्णाचा मृत्यू होतो. तज्ञांच्या मते, जर या स्ट्रेनची साखळी वेळेत तोडली गेली नाही तर कोरोनाची नवी लाट आणखी भयानक बनू शकते. आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे या स्ट्रेनची ओळख प्रथम झाली.