Flight | Representational Image (Photo Credits: Pixabay)

ब्रिटनमध्ये कोरोना वायरसच्या नव्या प्रजातीचं रूप आणि त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याचं लक्षात आल्यानंतर युके मध्ये लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात आले आहेत. या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आता भारताने देखील युके- भारत विमानसेवा तात्पुरती खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 डिसेंबरला रात्री 11.59 मिनिटांपासून ही विमानसेवा खंडीत करण्यात आली असून हा निर्णय सध्या 31 डिसेंबरच्या रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत लागू करण्यात आला आहे. तर 22 डिसेंबरपर्यंत भारतात येणार्‍या आणि जाणार्‍या प्रवाशांना संबंधित विमानतळावर आरटी पीसीआर टेस्ट करणं बंधनकारक आहे.

आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या महाविकास आघाडी मधील नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील केंद्राकडे युके- भारत दरम्यानच्या विमानसेवा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने करावा अशी मागणी केली होती. दरम्यान या कोरोना वायरसच्या बदलत्या रूपाच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट असल्याची माहिती सकाळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली होती. त्यावेळेस त्यांनी याबद्दल चिंता किंवा घाबरून जाण्याची गरज नसल्याचेही सांगितले होते. नक्की वाचा:  UK मधील New Strain of Coronavirus बद्दल भारत सरकार दक्ष, घाबरून जाण्याची गरज नाही: डॉ. हर्षवर्धन.

ANI Tweet

भारताप्रमाणे यापूर्वी सौदी अरेबिया, इटली, स्पेन सह काही युरोपीय देशांनी, इस्त्राईल, कुवेत, टर्की या देशांनी युके मधून येणारी-जाणारी वाहतूक थांबवली होती. तसेच पर्यटकांवर ततपुरती बंदी टाकली आहे. सध्या नाताळचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सुट्ट्यांचा काळ सुरू होत असल्याने मोठ्या प्रमाणात येणं-जाणं होण्याची शक्यता असल्याने या नवा वायरस पुन्हा झपाट्याने फैलावू शकते अशी भीती आहे. युके पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.