New Labour Codes: कर्मचाऱ्यांना मिळू शकेल आठवड्यातून तीन दिवसांची सुट्टी; चालू आहे नव्या लेबर कोड्सवर विचार
Government Offices (Photo Credit: PTI)

नवीन लेबर कोड (New Labour Codes) अंतर्गत येत्या काही दिवसांत कर्मचार्‍यांना आठवड्यातून तीन दिवस सुटी (Three Days Off) दिली जाऊ शकते. कामगार व रोजगार मंत्रालय या आठवड्यात चार नवीन कामगार संहिता लागू करण्यासाठी त्यांच्याशी संबंधित नियमांना अंतिम रूप देऊ शकते. या संहिता लागू झाल्यास देशाच्या कामगार बाजारपेठेत सुधारित नियम व कायद्यांचे नवे युग सुरु होईल. हा आराखडा अंतिम झाल्यास कर्मचार्‍यांना आठवड्यातून चार कामकाजाचे दिवस असतील आणि त्यासोबत तीन दिवस रजा मिळेल. नव्या नियमांतर्गत सरकारने कामाचे तास वाढवून 12 केले आहेत. आठवड्यामध्ये जास्तीत जास्त कार्यरत तासांची मर्यादा 48 आहे, त्यामुळे कामाचे दिवस पाचपेक्षा कमी केले जाऊ शकतात.

याशिवाय असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी आणि कल्याणासाठी मंत्रालय इंटरनेट पोर्टल तयार करत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे पोर्टल जूनपर्यंत तयार होऊ शकेल. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी नोंदणी व इतर सुविधा या पोर्टलवर देता येतील. यामध्ये कंत्राटी कामगार, फ्रीलान्स कामगार अशांची नोंदणी केली जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात अशा वेब पोर्टलच्या स्थापनेचा उल्लेख केला होता.

कामगार सचिव अपूर्व चंद्र म्हणाले, नियम तयार केले जात असून येत्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात सर्व संबंधितांशी चर्चा झाली आहे, त्यामुळे लवकरच मंत्रालय या चार नवीन संहिता लागू करण्याच्या स्थितीत असेल. यामध्ये पगार/वेतन कोड, औद्योगिक संबंधांचे कोड, कामाशी संबंधित सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी अटी आणि सामाजिक सुरक्षा कोड समाविष्ट आहे. कामगार मंत्रालयाची एप्रिलपासून चार संहिता लागू करण्याची योजना आहे. (हेही वाचा: LPG Gas कनेक्शनसाठी सरकार देत आहे 1600 रुपये; तुम्हीही घेऊ शकता फायदा, जाणून घ्या कुठे व कसे करा अप्लाय)

यामधील महत्वाची बाब म्हणजे, जर एखादा कर्मचारी दिवसाच्या 8 तासांपेक्षा जास्त किंवा आठवड्यात 48 तासांपेक्षा जास्त काम करत असेल, तर त्याला ओव्हरटाइम वेतन सामान्य पगारापेक्षा दुप्पट मिळेल. तसेच नव्या कामगार संहितेच्या मसुद्यात कर्मचार्‍यांच्या कामाचे तास दिवसासाठी 12 तास करण्याचे प्रस्तावित आहे. पूर्वी हा कालावधी 9 तासांचा होता आणि त्यात एक तास विश्रांतीचा समावेश होता.