Chandrayaan-3 (PC - Twitter/@ISRO)

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या ऐतिहासिक सॉफ्ट लँडिंगची तारीख 23 ऑगस्ट हा केंद्रीय मंत्रिमंडळाने औपचारिकपणे ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ (National Space Day) म्हणून घोषित केला आहे. चांद्रयान-3 मोहिमेचे ऐतिहासिक यश साजरे करण्यात राष्ट्रासोबत केंद्रीय मंत्रिमंडळ देखील सहभागी होत आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देशातील वैज्ञानिकांच्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा करण्यात आली. 23 ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा करण्याच्या निर्णयाचे मंत्रिमंडळाने स्वागत केले.

केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरोचे त्यांच्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. चंद्रावर अचूक अंदाजासह उतरणे हीच एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. कठीण परिस्थितीवर मात करून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणे हा आपल्या वैज्ञानिकांच्या गुणवत्तेचा दाखला आहे.

तंत्रज्ञानविषयक प्रगती आणि नावीन्यपूर्ण शोधांचा प्रयत्न होत असलेल्या या युगात भारताचे वैज्ञानिक ज्ञान, समर्पण आणि कौशल्याचा तेजस्वी प्रकाशस्तंभ आहे यावर मंत्रिमंडळाचा ठाम विश्वास आहे. त्यांचे विश्लेषणात्मक कौशल्य, नव्याचा शोध घेण्याची चौकस वृत्ती आणि ध्यास प्रति उत्कट वचनबद्धतेने देशाला जागतिक  स्तरावरील वैज्ञानिक कामगिरीमध्ये आघाडीवर नेले आहे.

चांद्रयान-3 आणि एकूणच भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या यशामध्ये महिला वैज्ञानिकांनी मोठ्या संख्येने योगदान दिले आहे हे पाहून मंत्रिमंडळाला अभिमान वाटतो. आगामी काळात अनेक महत्वाकांक्षी महिला वैज्ञानिक यामुळे प्रेरित होतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्र आणि आपले स्टार्ट अप उद्योग यांना अवकाश संशोधन क्षेत्रासाठी भारतात अधिक संधी मिळतील अशी खात्री दिली आहे. अवकाश क्षेत्रातील उद्योग, शिक्षण क्षेत्र आणि स्टार्ट अप यांची परिसंस्था निर्माण करण्यासाठी आणि अवकाशविषयक जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मोठा वाटा मिळवण्यासाठी जून 2020 मध्ये केंद्रीय अवकाश मंत्रालयाच्या अखत्यारीत, स्वायत्त संस्था म्हणून आयएन-एसपीएसीईची स्थापना करण्यात आली. ही संस्था, अवकाश संशोधनाच्या विश्वात, भारताची झेप आणखी वाढवण्यासाठीचे साधन झाली आहे. हॅकेथॉन्सच्या आयोजनावर भर दिल्यामुळे देशातील तरुण भारतीयांसाठी अनेकानेक संधी खुल्या झाल्या आहेत. (हेही वाचा: Chandrayaan-3: चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात सतत होत आहे बदल, पेलोडद्वारे मोजण्यात आले तापमान; विक्रम लँडरने दिली मोठी माहिती)

चंद्रावर जेथे चांद्रयान-2 ची पाऊलखुणा उमटल्या आहेत त्या जागेला ‘तिरंगा’ आणि चांद्रयान-3 जेथे उतरले त्या जागेला ‘शिवशक्ती’ अशी नावे देण्याच्या निर्णयाचे केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वागत केले आहे. चांद्रयान-3 चे यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'जय विज्ञान, जय अनुसंधान' या घोषणेची  सर्वात मोठी साक्ष आहे. अंतराळ क्षेत्रात आता भारतीय देशांतर्गत स्टार्ट-अप आणि एमएसएमईसाठी आणखी वाव  निर्माण होईल आणि लाखो रोजगाराची निर्मिती आणि आणि नवीन संशोधनांना  वाव मिळेल.हे भारतातील तरुणांसाठी संधींचे जग खुले करेल. चांद्रयान -3 मोहिमेच्या यशातून मिळणारे ज्ञान विशेषतः ग्लोबल साऊथमधील देशांच्या  मानवतेच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी उपयोगात आणले जाईल, असे निःसंदिग्धपणे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वसुधैव कुटुंबकमवरची आपल्या कालातीत विश्वासाची भावना पुन्हा एकदा व्यक्त केली आहे.