
नागरिकांना सहभागी करून घेणारा भारत सरकारचा मंच- मायजीओव्ही आणि उच्चशिक्षण विभाग यांनी एकत्रितपणे, भारतीय भाषा शिकून घेण्याचे ॲप तयार करण्यासाठी नवोन्मेषाचे आव्हान अभिनव विचार करणाऱ्यांसमोर ठेवले आहे. भारताची सांस्कृतिक विविधता साजरी करण्याचा पंतप्रधानांचा दृष्टिकोन, तिच्या घटकांमध्येच अधिक संवाद घडवून आणत त्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्यासाठी याचा प्रारंभ करण्यात आला आहे.
कोणतीही भारतीय भाषा शिकून घेऊन त्यात साधीसरळ वाक्ये तयार करण्याचे व ती भाषा व्यवहारात वापरण्याचे शिक्षण कोणत्याही व्यक्तीला देणारे ॲप तयार करण्याचे आव्हान मायजीओव्हीने समोर ठेवले आहे. देशात अधिक दृढ अशी सांस्कृतिक सहभावना निर्माण करण्यासाठी, प्रादेशिक भाषांच्या साक्षरतेस प्रोत्साहन देणारे ॲप तयार करून घेणे हा यामागील उद्देश आहे. हे ॲप वापरण्यास सोपे, साधे, ग्राफिकल यूजर इंटरफेस, गॅमीफिकेशन गुणधर्म, UI, UX आणि सुपीरिअर कन्टेन्ट असणारे असे असले पाहिजे, आणि भारतीय भाषा शिकून घेण्याचा प्रवास सहज हसतखेळत पार पडण्यासाठी या ॲपची मदत झाली पाहिजे, हे यातील प्रमुख मापदंड असतील.
हे नवोन्मेष आव्हान झेलण्यासाठी कोणतीही भारतीय व्यक्ती, स्टार्ट अप आणि कंपनी पुढे येऊ शकेल. हे ॲप , लिखित शब्द, आवाज आणि दृश्यफितीच्या माध्यमातून भाषा शिकविणारे व मल्टी-मॉड्युलर असावे असे मायजीओव्हीने म्हटले आहे. शिकणाऱ्यांच्या सोयीसाठी ॲपनिर्माते बहुविध इंटरफेसेसचा वापर करू शकतात. या नवोन्मेष आव्हानाची माहिती पुढील लिंकवर मिळू शकेल- https://innovateindia.
तसेच यासाठीचे सर्व नियम व अटीही त्याच पानावर पाहता येतील. हे आव्हान पेलू इच्छिणाऱ्यांनी या संकेतस्थळाला जरूर भेट द्यावी.
या नवोन्मेष आव्हानासाठी पुढे येण्याची अंतिम दिनांक 27 मे 2021 अशी आहे. पाठविलेल्या प्रोटोटाइपचे मूल्यांकन झाल्यावर सर्वोत्कृष्ट 10 संघाना सादरीकरणासाठी पाचारण केले जाईल आणि सर्वोत्कृष्ट 3 संघांची परीक्षकांकडून निवड करण्यात येईल. या तीन संघाना अधिक चांगले ॲप तयार कारण्यासाठी अनुक्रमे 20, 10 आणि 5 लाख रुपयांचा निधी देण्यात येईल. अभिनव संकल्पना, मोठ्या प्रमाणात वापरण्याची क्षमता, उपयोगिता, इंटरऑपरेबिलिटी व प्रत्यक्ष अंमलात आणण्यातील सुटसुटीतपणा या मापदंडांवर ॲपचे स्थूलमानाने मूल्यांकन करण्यात येईल.