Murder Rate: हत्येच्या दराबाबत नागपूर, पाटणा ठरले देशात अव्वल; NCRB रिपोर्टमधून धक्कादायक बाब समोर 
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या 2020 च्या आकडेवारीवरून समोर आले आहे की, देशात नागपूर (Nagpur) आणि पाटणा याठिकाणी प्रति एक लाख लोकसंख्येमध्ये सर्वाधिक हत्येचे प्रमाण (3.9) आहे. त्यानंतर जयपूर (3.1) आणि दिल्ली (2.8) यांचा नंबर लागतो. 2011 च्या लोकसंख्येचा वापर करून हत्येचा दर काढण्यात आला आहे. नागपूरची लोकसंख्या 25 लाख आहे. मात्र, शहराच्या माजी आणि सध्याच्या पोलिसांनी ही बाब चुकीची असल्याचे सांगितले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

वरिष्ठ पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नागपुरमध्ये 2020 मध्ये 97 खून झाले आहेत, 2011 च्या लोकसंख्येच्या घनतेमुळे मुंबईपेक्षा (148 खून) हे प्रमाण जास्त आहे. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडीत नाही. माजी शहर पोलीस प्रमुख (सीपी) बी के उपाध्याय म्हणाले, एनसीआरबी नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या संख्येत प्रोक्टिव्ह पोलिसिंगच्या प्रतिबंधात्मक कृती जोडते, ज्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढते. जेव्हा इतर शहरांपेक्षा कमी लोकसंख्येचा आकडा गुन्हे मोजण्यासाठी वापरला जातो, तेव्हा त्याची टक्केवारी वाढते.

नागपुरात हिंसक गुन्ह्यांची एकूण संख्या सातत्याने कमी होत असली तरी खून, बलात्कार, चोरी आणि अशा काही इतर गुन्ह्यांनी शहराची प्रतिमा डागाळली आहे. उपाध्याय म्हणाले, ‘जेव्हा मी कार्यभार सोपवला तेव्हा गंभीर गुन्हे नक्कीच 20-25% कमी झाले होते.’ एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार हिंसक गुन्ह्यांसाठी नागपूर एक लाख लोकसंख्येमागे 25.0 दराने मुंबई (184) आणि पुणे (50.5) नंतर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत Narendra Giri यांची आत्महत्या; खोलीत सापडली सुसाईड नोट, शिष्य Anand Giri ला ठरवले जबाबदार)

आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, नागपूर आणि सुरतमध्ये (11) दिल्ली (17) नंतर रोमँटिक संबंधांबाबत सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे. नागपुरात सुमारे 15 हत्या या आर्थिक वादांशी संबंधित होत्या, ज्यामुळे याबाबत शहराचा देशात तिसरा क्रमांक लागतो. वैयक्तिक सूडबुद्धीमुळे सुमारे 23 हत्या झाल्या. 2020 मध्ये नागपुरात हत्या झालेल्यांमध्ये चार ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.

चोरीच्या घटनांमध्ये नागपूरचा 82.7 गुन्हेगारीचा दर राज्यात सर्वाधिक आहे, जो मुंबई (33.9) आणि पुण्याला (31.0) मागे टाकतो. सीपी अमितेश कुमार म्हणाले की नागपूरला मोठ्या संख्येने खून प्रकरणांची पार्श्वभूमी आहे, जी सरासरी दरवर्षी 100 च्या आसपास राहते.