Mahant Narendra Giri (Photo Credits: ANI)

देशभरात आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असणारे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे (Akhil Bharatiya Akhara Parishad) अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (Narendra Giri) यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह अल्लापूरमधील बाघंबरी गड्डी मठाच्या खोलीत फाशीला लटकलेला आढळला. माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. आयजी रेंज केपी सिंह यांनी सांगितले की तेही मठात पोहोचले आहेत. सध्यातरी महंत यांनी फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण दिसत आहे. फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. शिष्यांनी दरवाजा तोडून मृतदेह फासावरून खाली उतरवल्याचे कळते.

पोलिसांनी सांगितले की त्यांना घटनास्थळी पाच पानांची सुसाईड नोट देखील सापडली आहे, ज्यात त्यांनी शिष्य आनंद गिरी आणि इतर दोघांना त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. आनंद गिरीला उत्तराखंडमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. नोटमध्ये शिष्य आनंद गिरीकडून अत्याचार होत असल्याचा उल्लेख आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सुसाईड नोटचे हस्ताक्षरही तपासले जाईल.

मीडियाला संबोधित करताना प्रयागराजचे महानिरीक्षक के.पी.सिंह म्हणाले, ‘महंत यांनी एक अतिशय तपशीलवार सुसाईड नोट लिहिली आहे, ज्यात त्यांनी त्यांच्या सामानाची यादी लिहिली आहे. हे सामान संबंधित लोकांना देण्यात यावे असे त्यांनी सांगितले आहे. या नोटमध्ये त्यांचे मृत्युपत्र देखील आहे.’

याआधी गिरी यांना कोविड-19 ची लागण झाल्यानंतर त्यांना ऋषीकेशच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले होते. जिथे ते बरे झाले व काही दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री योगी, शिवराज सिंह चौहान, केशव प्रसाद मौर्य अशा अनेक नेत्यांनी नरेंद्र गिरी यांच्या निधनाबद्दल दु: ख व्यक्त केले आहे. (हेही वाचा: Gujarat Shocker: पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी पतीला अटक, गुजरातच्या राजकोट येथील घटना)

दरम्यान, महंत नरेंद्र गिरी यांचे शिष्य आनंद गिरी हे अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ऑस्ट्रेलियातही त्यांच्यावर शिष्यांसोबत लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर महंत नरेंद्र गिरी यांनी त्यांना गेल्या वर्षी आखाड्यामधून बाहेरचा रस्ता दाखवला.