प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

मुंबई लोकल मार्गावर एसी लोकलला (AC Local) मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहता रेल्वे प्रशासनाने फर्स्ट क्लासचा पास असणार्‍यांना एसी लोकलमधून प्रवास करण्यासाठी आपला पास अपग्रेड करण्याची मुभा दिली आहे. आज 24 सप्टेंबर पासून प्रवासी या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. पण ही सुविधा घेण्यापूर्वी त्यांना काही नियम देखील जाणून घेणं आवश्यक आहे.

रेल्वे प्रशासनाने फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना एसी लोकलची मुभा दिली असली तरीही ही सोय केवळ तीन, सहा आणि बारा महिन्यांचा पास असलेल्या प्रवाशांसाठीच असणार आहे. दरम्यान एसी आणि सामान्य लोकलचा दर यामधील तफावत भरून तिकीट खिडकीवर तुम्ही आपला नवा पास अपग्रेड करू शकाल. मासिक पास असणार्‍यांसाठी ही सुविधा नसेल. तसेच हार्बर रेल्वे लाईन वर एसी लोकल धावत नसल्याने तेथील प्रवाशांनाही ही अपग्रेडची सोय नसेल.

सध्या हा पास अपग्रेडेशनचा पर्याय तिकीट खिडक्यांवर उपलब्ध करून दिला जात आहे. The Centre for Railway information systems अर्थात क्रिस कडून पासच्या अपग्रेडेशन बाबत सॉफ्टवेअर मध्ये आवश्यक बदल सुरू आहेत. त्यामुळे हा बदल येत्या काही महिन्यात ऑनलाईन तिकीट बुकिंग अ‍ॅप यूटीएस वर देखील उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

सध्या पश्चिम रेल्वेवर1375 लोकल फेऱ्या धावतात. त्यामध्ये एसी लोकल फेऱ्यांची संख्या 48 आहे. तर, मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या 56 फेऱ्या चालवल्या जातात.