Mumbai-Delhi Travel Time: दिलासादायक! मुंबई-दिल्ली प्रवासाचा वेळ 30 टक्क्यांनी कमी होणार; प्रवाशांना मिळणार सुधारित पायाभूत सुविधांचा लाभ
Representational Image |(Photo Credits: PTI)

भारतीय रेल्वेने (Indian Railways) मुंबई-दिल्ली (Mumbai-Delhi) प्रवास करणाऱ्या लोकांसाठी दिलासादायक बाब आहे. मार्च 2024 नंतर मुंबई आणि दिल्ली दरम्यानचा प्रवासाचा वेळ 33 टक्क्यांहून अधिक कमी होणार आहे. भारतीय रेल्वे मुंबई दिल्ली मार्गांचे मार्च 2024 पर्यंत 160 किमी प्रतितास असे अपग्रेडेशन पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवत आहे. यामुळे दोन्ही शहरातील प्रवासाचा वेळ बराच कमी होणार आहे. एका रेल्वे अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. सध्या, राजधानी ही मुंबई-दिल्ली मार्गासाठी 1,386 किमी अंतर 15 तास 40 मिनिटांत सरासरी 89 किमी प्रतितास वेगाने कापणारी सर्वात वेगवान एक्सप्रेस ट्रेन आहे.

शनिवारी, व्हीके त्रिपाठी, सीईओ आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. पुनरावलोकनादरम्यान, संबंधित अधिकार्‍यांनी त्यांना आश्वासन दिले की हा प्रकल्प मार्च 2024 पूर्वी पूर्ण होईल. 'मिशन राफ्तार' अंतर्गत हा प्रकल्प पूर्णत्वास नेला जात आहे. एकूण 56 पैकी 42 निविदांना अंतिम रूप देण्यात आले आहे, तर 14 लवकरच अंतिम केले जातील, वेस्टर्न रेलेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई-दिल्ली ट्रेनचा वेग ताशी 160 किमीपर्यंत वाढवल्याने प्रवासी गाड्यांच्या सरासरी वेगात 60% वाढ होईल आणि मालवाहतुकीचा सरासरी वेग दुप्पट होण्यास मदत होईल. सध्या, दिल्ली-मुंबई कॉरिडॉरवर दररोज सुमारे 90 प्रवासी रेल्वे सेवा आणि तेवढ्याच मालवाहू गाड्या धावतात. एकदा का हा मार्ग 160 किमी प्रतितास वेगाने सुधारित झाल्यानंतर, विभागात आणखी प्रवासी गाड्या सुरू करण्यास वाव मिळेल. यामुळे काही लोकप्रिय गाड्यांमधील प्रवाशांची प्रतीक्षा यादी कमी होईल.

रेल्वे अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, 25 टक्के प्रवासी राजधानीने जाण्यास प्राधान्य देतील कारण ही ट्रेन त्यांना नेहमी इंटरनेटशी कनेक्ट ठेवण्यात मदत करते. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये पश्चिम रेल्वेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ती मुंबई सेंट्रल ते नागदा दरम्यानच्या मुंबई-दिल्ली मार्गाचा सर्वात मोठा भाग (जवळजवळ 50%) व्यापते. (हेही वाचा: विमान प्रवास महागणार! जेट इंधनाने गाठला विक्रमी उच्चांक; ATF च्या किमती 3.22 टक्क्यांनी वाढल्या)

मार्गावरील जास्तीत जास्त वेग वाढवल्याने वंदे भारत एक्स्प्रेस सारख्या सेमी-हाय स्पीड गाड्या सुरू होण्याची शक्यता देखील वाढेल आणि अशा गाड्यांना 160 किमी प्रतितास वेगाने प्रवास करण्याची परवानगी मिळू शकते. या प्रकल्पामुळे सुरक्षा आणि विश्वासार्हता लक्षणीयरीत्या वाढेल. एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, ‘दिल्ली-मुंबई सेक्टरमध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातचा समावेश होतो. त्यामुळे एकूण सात राज्यांतील प्रवाशांना सुधारित पायाभूत सुविधांचा फायदा होईल.’