ATF Prices Hike: विमान प्रवास महागणार! जेट इंधनाने गाठला विक्रमी उच्चांक; ATF च्या किमती 3.22 टक्क्यांनी वाढल्या
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Instagram)

ATF Prices Hike: विमान इंधनाच्या (ATF) किमतीत आणखी 3.22 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये विमान इंधनाच्या किमतीतील (Jet Fuel) ही नववी वाढ आहे. जागतिक स्तरावर ऊर्जेच्या किमतीत वाढ झाली आहे, ज्याचा परिणाम विमानाच्या इंधनावरही झाला आहे. सरकारी मालकीच्या पेट्रोलियम कंपन्यांच्या किंमत अधिसूचनेनुसार, राष्ट्रीय राजधानीतील एटीएफच्या किमती 3,649.13 रुपये प्रति किलोलिटर किंवा 3.22 टक्क्यांनी वाढल्या आहेत. आता राष्ट्रीय राजधानीत ATF ची किंमत 1,16,851.46 रुपये प्रति किलोलीटर (116.8 रुपये प्रति लीटर) वर पोहोचली आहे.

दरम्यान, सलग 25 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी वाहनांच्या इंधनाच्या दरात प्रतिलिटर 10 रुपयांची विक्रमी वाढ झाली होती. विमानाच्या इंधनाच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला सुधारल्या जातात. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सुधारले जातात. (हेही वाचा -LPG Cylinder Price Hike: महागाईचा झटका! एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नव्या किंमती)

यापूर्वी 16 मार्च रोजी एटीएफच्या किमती 18.3 टक्के किंवा 17,135.63 रुपये प्रति किलोलीटरने वाढल्या होत्या. त्याच वेळी, 1 एप्रिल रोजी देखील विमानाचे इंधन दोन टक्के किंवा 2,258.54 रुपये प्रति किलोलिटरने महागले होते. 16 एप्रिल रोजी त्याच्या किमतीत 0.2 टक्क्यांनी किरकोळ वाढ झाली होती. मुंबईत एटीएफची किंमत आता 1,15,617.24 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. तर कोलकात्यात 1,21,430.48 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,20,728.03 रुपये प्रति किलोलीटर दराने एटीएफ विकले जात आहे.

दरम्यान, स्थानिक करांमुळे एटीएफची किंमत राज्यानुसार बदलते. विमानाच्या इंधनाचा वाटा विमान कंपनीच्या ऑपरेटिंग खर्चाच्या सुमारे 40 टक्के आहे. 2022 च्या सुरुवातीपासून दर पंधरवड्याला एटीएफच्या किमतीत वाढ होत आहे. 1 जानेवारीपासून नऊ वेळा एटीएफच्या किमती 42,829.55 रुपये प्रति किलोलीटर किंवा 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत.