
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या वादळी घडामोडीत, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते नाना पटोले (Nana Patole) यांना विधानसभेतून एक दिवसासाठी निलंबीत करण्यात आले आहे. नाना पटोले यांनी मंगळवारी (1 जुलै) सभापतींच्या व्यासपीठावर जाऊन निषेध नोंदवल्यानंतर एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले. भाजप (BJP) नेत्यांनी शेतकऱ्यांविरुद्ध वारंवार केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याचे सभागृहात आज जोरदार पडसाद उमटले. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष उडाला. विधानसभा अध्यक्षांना या मुद्द्यावर सभागृहदेखील तहकूब करावे लागले.
काय घडले नेमके?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार बाबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या कथित अपमानास्पद विधानांवरून सभागृहात गोंधळ उडाला. नाना पटोले यांनी इतर विरोधी आमदारांसह घोषणाबाजी करत सभापतींच्या आसनाजवळ जाऊन सरकारकडून माफीची मागणी केली. या वेळी सभापती राहुल नार्वेकर यांनी वारंवार सूचित केल्यानंतरही पटोले मागे हटले नाहीत, त्यामुळे त्यांनी सभेची शिस्त राखण्यासाठी पटोलेंना एका दिवसासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल
निलंबनानंतर माध्यमांशी बोलताना पटोले यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आज शेतकरी दिन आहे. पण उद्दाम मोदी सरकार आणि त्याचे मंत्री शेतकऱ्यांना भिकारी समजतात. जे शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतात त्यांना सभागृहाबाहेर काढले जाते आणि जे त्यांचा अपमान करतात त्यांना सन्मान दिला जातो, असे ते म्हणाले. त्यांनी अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीबाबतही सरकारवर टीका केली आणि पीक विमा योजना रद्द झाल्याचे सांगितले. हे सरकार भ्रष्ट असून शेतकरीविरोधी आहे. आम्ही लढा थांबवणार नाही. दररोज निलंबित झालो तरी चालेल, असे पटोले म्हणाले.
दरम्यान, पटोले यांनी सभागृहात बोलताना म्हटले की, 'मोदी तुमचे वडील असतील, पण ते शेतकऱ्यांचे वडील कधीच होऊ शकत नाहीत.' या विधानावर सत्ताधारी बाकांवरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटोलेंच्या वर्तनावर नाराजी व्यक्त करत म्हटले, भावना व्यक्त करणं वेगळं आहे, पण सभापतींवर धाव घेणं अत्यंत अयोग्य आहे. स्वतः एकेकाळचे सभापती असलेले पटोले यांनी खुर्चीचा सन्मान राखायला हवा. त्यांना माफी मागावी लागेल. सभापती नार्वेकर यांनीही पटोले यांना असंसदीय भाषा वापरू नये, असा इशारा दिला.
दरम्यान, निलंबनानंतर विरोधी आमदारांनी पुन्हा घोषणाबाजी सुरू केली आणि भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून माफीची मागणी केली. संपूर्ण सत्र तणावपूर्ण वातावरणात सुरू राहिले, विरोधकांनी सरकारवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.