
मंत्रालयात बॉम्ब (Bomb Threat) ठेवल्याच्या निनावी धमकीमुळे एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) माहिती मिळताच मंत्रालयाची इमारत आणि परिसरात शोधमोहीम तातडीने सुरु केली. प्रदीर्घ काळ शोध घेऊनही हाती काहीच लागले नाही. मात्र, पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात फोन करणारा इसम हा अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. दुसऱ्या बाजूला पोलिसांनी आणखी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. मंत्रालयात धारधार चाकू घेऊन प्रवेश करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. प्रवेशद्वारावर सामन स्कॅन करणाऱ्या मशिनमध्ये त्याच्या बॅगमध्ये चाकू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
दरम्यान, मंत्रालयात बॉम्ब ठेवणारा व्यक्ती कोण आहे? त्याने हा फोन कोणत्या उद्देशाने केला. त्याने हा फोन स्वत:च केला आहे की, त्यापाठीमागे आणखी इतर कोणी व्यक्ती, संस्था आहे, असे एक ना अनेक प्रश्नांची उत्तर अद्याप अनुत्तरीत आहेत. दुसऱ्या बाजूला त्याने आपणास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटायचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे एकाबाजूला धमकी आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांना भेटण्याची व्यक्त केलेली इच्छा, त्यामुळे या व्यक्तीने धमकी देताना वापरलेली वाक्यरचना परस्पर विरोधी आहे. त्यामुळेही संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मंत्रालयात अथवा मुंबईतील एखाद्या रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या येण्याची घटना नवी नाही. या आधीही अनेक वेळा धमकीचे असे फोन कॉल आले आहेत. काही वेळा राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांच्या घर, कार्यालयामध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या आल्या आहेत. यातील काही धमक्या हा केवळ बनाव असल्याचे तर काही प्रकरणांमध्ये आरोपी मातेफीरू, नैराश्येने ग्रासलेले किंवा कोणाशीतरी झालेल्या किरकोळ वादातून हे कृत्य करताना आढळले आहेत. त्यामुळे आता नव्याने आलेल्या धमकीतील व्यक्ती कोण आहे. हे तपासानंतरच पुढे येणार आहे.