आशियातील सर्वात मोठा साउंडप्रूफ पूल (संग्रहित संपादित प्रतिमा)

Asia's Largest Soundproof Bridge Damaged: मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. सार्वजनिक मालमत्तेवरही याचा परिणाम दिसून येत आहे. पावसामुळे इथल्या सिवनी (Seoni) जिल्ह्यातील आशियातील सर्वात मोठा आणि देशातील पहिला साउंडप्रूफ पूलही (Soundproof Bridge) तुटला आहे. त्यामुळे एका बाजूने वाहतूक बंद ठेवावी लागली. आशियातील सर्वात मोठा आणि देशातील पहिला ध्वनीरोधक पूल सिवनी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 44 वर बांधण्यात आला आहे. काश्मीर ते कन्याकुमारी यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 44 सिवनी जिल्ह्यातून जातो आणि हा ध्वनीरोधक पूल याच महामार्गाचा एक भाग आहे. जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे या साऊंड प्रूफ पुलाची दुरवस्था झाली आहे. आता त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, त्यामुळे महामार्गावर सतत वाहतूक कोंडी होत आहे.

सिवनी ते नागपूर मार्गावर पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलांमध्ये हा आशियातील सर्वात मोठा साउंडप्रूफ पूल बांधण्यात आला आहे. या पुलावरून वाहने वेगाने धावतात, मात्र पुलाखाली वाहनांचा आवाज ऐकू येत नाही. त्यावर लाइट रिड्यूसरही बसवण्यात आला आहे. त्यावर वन्यजीवांसाठी 14 प्राणी अंडरपासही बांधण्यात आले आहेत. 29 किलोमीटर लांबीचा हा पूल 960 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. तो दिलीप बिल्डकॉन या खासगी कंपनीने बांधला होता. त्यांनी या पुलासाठी 10 वर्षांची हमी दिली होती, मात्र अवघ्या 5 वर्षांत तो पावसात तग धरू शकला नाही आणि अनेक ठिकाणी तुटला आहे. मुसळधार पावसामुळे या पुलावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. (हेही वाचा: Araria Bridge Collapses Before Inauguration: बिहारमध्ये उद्घाटनापूर्वीच कोसळला पूल; 12 कोटी रुपये खर्चून होत होता तयार)

मध्य प्रदेशमधील आशियातील सर्वात मोठा साउंडप्रूफ पूल तुटला-

राष्ट्रीय महामार्ग 44 हा  भारतातील सर्वात लांब महामार्ग, उत्तरेकडील काश्मीरपासून दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आहे. एकूण 4,112 किलोमीटर व्यापलेला हा मार्ग मध्य प्रदेशमधून जातो. या महामार्गावर सिवनी आणि नागपूर दरम्यान असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळ 'ध्वनीरोधक' पूल वन्यप्राण्यांना जाणाऱ्या वाहनांच्या आवाजापासून वाचवण्यासाठी बांधण्यात आला होता. ध्वनीरोधक रचना हे सुनिश्चित करते की, कोणत्याही वाहनाचा आवाज खाली जमिनीवर पोहोचणार नाही, ज्यामुळे आजूबाजूच्या घनदाट जंगलात वन्यजीवांसाठी शांतता राखण्यात मदत होते. मात्र या पुलाला तडे गेल्याने त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.