
जगातील सर्वाधिक गर्दीच्या किंवा रहदारीच्या शहरांमध्ये (Most Traffic Congested Cities) भारतातील बंगळूरूला (Bengaluru) दुसरे स्थान (सिटी सेंटर श्रेणीमध्ये) मिळाले आहे. हे रँकिंग 2022 च्या ट्रॅफिक इंडेक्सचे आहे, ज्याचे आकडे डच लोकेशन टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट टॉमटॉम यांनी प्रकाशित केले आहेत. आकडेवारीनुसार, 2022 मध्ये, बेंगळुरूच्या लोकांना 10 किमी अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ 29 मिनिटे आणि 10 सेकंद आहे.
बेंगळुरूमध्ये गर्दीच्या वेळी वाहनांचा सरासरी वेग 18 किमी प्रतितास होता, जो 2021 च्या 14 किमी प्रतितास पेक्षा 4 किमी जास्त आहे. अहवालात सिटी सेंटर श्रेणीमध्ये लंडनला सर्वाधिक रहदारी असलेले शहर म्हणून पहिले स्थान देण्यात आले आहे. लंडनमध्ये 10 किमी अंतर कापण्यासाठी 36 मिनिटे 20 सेकंद लागले. सिटी सेंटर श्रेणीमध्ये आयर्लंडमधील डब्लिन हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक गर्दीचे शहर होते. दिल्ली आणि मुंबई अनुक्रमे 34 आणि 47 व्या क्रमांकावर होते.
मेट्रो एरिया श्रेणीमध्ये बोगोटा हे सर्वात गर्दीचे शहर ठरले आहे. त्यापाठोपाठ मनिला, सपोरो, लिमा, बेंगळुरू (5वा), मुंबई (6वा), नागोया, पुणे (8वा), टोकियो आणि बुखारेस्ट यांचा क्रमांक लागतो. मेट्रो सिटी एरिया श्रेणीमध्ये, बंगळुरूच्या प्रवाशांना 10 किमी अंतर कापण्यासाठी 23 मिनिटे आणि 40 सेकंद लागले. शहरातील सरासरी वेग 22 किमी प्रतितास होता. शहराच्या मध्यभागी शहराचा सर्वात व्यस्त भाग व्यापून 5 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये येणारा भाग हा सिटी सेंटर मानला जातो. तर मेट्रो क्षेत्रात संपूर्ण परिसराची वाहतूक मोजली जाते. यामध्ये शहराच्या मध्यभागी आणि बाहेरील भागांचा समावेश आहे. (हेही वाचा: Smart Cities: मार्चपर्यंत तयार होणार देशातील 22 स्मार्ट शहरे; महाराष्ट्रातील 3 शहरांचा समावेश, घ्या जाणून)
अहवालात असे म्हटले आहे की, बेंगळुरू शहरातील 2022 मध्ये 15 ऑक्टोबर हा सर्वात व्यस्त रहदारीचा दिवस होता. त्या दिवशी, शहराच्या मध्यभागी गाडी 10 किमी चालवण्याचा सरासरी प्रवास वेळ 33 मिनिटे 50 सेकंद होता. डेटा दर्शवितो की बेंगळुरूमध्ये 10 किमी प्रवास करण्यासाठी लागणारा सरासरी वेळ 40 सेकंदांनी वाढला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बेंगळुरूमध्ये राहणाऱ्या लोकांनी सरासरी 260 तास (10 दिवस) ड्रायव्हिंग केले आहे आणि ते 134 तास ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. अहवाल प्रसिद्ध करण्यापूर्वी, टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सने सहा खंडांमधील 56 देशांतील 389 शहरांमधील माहितीचा अभ्यास केला आहे.