भारतात मागील 24 तासांत झाल्या COVID-19 च्या 6 लाखाहून अधिक चाचण्या; Testing Capacity 10 लाखापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट- आरोग्य मंत्रालय
Coronavirus (Photo Credits: PTI)

देशातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फैलाव आटोक्यात आणण्यासाठी सरकारसह आरोग्य यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत असून टेस्टिंग (Testing), ट्रॅकिंग (Tracking) आणि ट्रिटमेंट (Treatment) या त्रिसुत्रीवर भर दिला जात आहे. आतापर्यंत देशात कोविड-19 (Covid-19) च्या तब्बल 6 लाखाहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसंच दिवसाला 10 लाख चाचण्या करण्याची क्षमता निर्माण करणे हे सरकारपुढील उद्दिष्ट आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. टेस्टिंग म्हणजे अधिकाधिक टेस्ट करायच्या. ट्रॅकिंग म्हणजे कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ट्रॅक करायचे आणि ट्रिटमेंट म्हणजे त्यांच्यावर उपचार करायचे. याच त्रिसुत्रीच्या आधारे आतापर्यंत देशातील कोरोना व्हायरसची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे.

देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 15 लाखांचा टप्पा पार केला असला तरी इतर देशांच्या तुलनेत भारतातील कोविड-19 ची परिस्थिती उत्तम आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांची दिलासादायक संख्या. सध्या देशात कोरोना व्हायरसच्या अॅक्टीव्ह रुग्णांपेक्षा कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट सुधारत आहे. तसंच मृत्यू दरही अत्यंत कमी आहे. (भारतात कोरोना व्हायरस रुग्णांबाबत दिलासादायक गोष्ट; तब्बल 10 लाख संक्रमित लोक झाले बरे, देशाचा रिकव्हरी रेट 64.4 टक्के)

ANI Tweet:

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारपर्यंत देशातील कोरोना बाधितांचा आकडा 15,83,792 वर पोहचला असून त्यातील 5,28,242 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत देशात एकूण 10,20,582 रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एकूण 34,968 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणित मोठी भर पडत आहे.