प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty)

भारतातील कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नाही. सध्या वाढत असलेला संसर्ग पाहून आता लवकरच संक्रमित देशांच्या बाबतीत भारत ब्राझीलला मागे टाकून, जगात दुसर्‍या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे. बुधवारी भारतात प्रथमच 50 हजाराहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली असून, देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 15.83 लाखांवर गेली आहे. मात्र यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे, देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. महत्वाचे म्हणजे, भारतामध्ये आतापर्यंत 10 लाखांहून अधिक कोविड-19 रुग्ण बरे झाले आहेत किंवा त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे भारतातील दहा लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत आणि ही फार मोठी गोष्ट आहे. यावरून हे दिसून येते की, डॉक्टर, परिचारिका आणि फ्रंटलाईनवर काम करत असलेल्या आरोग्य सेवा कामगारांनी खूप परिश्रमपूर्वक आणि प्रामाणिकपणे कार्य केले आहे. भारतात चाचणी सुविधा देखील वाढविण्यात आल्या आहेत. देशात 1 कोटी 81 हजाराहून अधिक लोकांची चाचणी झाली आहे. एका महिन्यात सुमारे 1 कोटी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. याच आठवड्यात तीन दिवस दररोज 5 लाखांपेक्षा जास्त चाचण्या घेतल्या गेल्या आहेत. (हेही वाचा: केंद्र सरकारने जाहीर केली अनलॉक 3 ची मार्गदर्शक तत्त्वे; देशात 5 ऑगस्ट पासून सुरु होणार जिम, सिनेमा हॉलवरील बंदी कायम, जाणून घ्या सविस्तर)

एएनआय ट्वीट - 

देशातील 10 लाख लोकसंख्येवर दररोज 324 चाचण्या घेतल्या जात आहेत. अशाप्रकारे अनेक राज्ये डब्ल्यूएचओ मार्गदर्शक तत्त्वापेक्षा अधिक चाचणी घेत आहेत. राजेश भूषण पुढे म्हणाले, सध्या देशात रिकव्हरी रेट 64.44 टक्के आहे. अशी 16 राज्ये आहेत, जिथे रिकव्हरी रेट राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे. रिकव्हरीचे प्रमाण दिल्लीत 88 टक्के, लडाखमध्ये 80 टक्के आणि हरियाणामध्ये 78 टक्के आहे. त्याशिवाय आसाममध्ये 76%, तेलंगणात 74%, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये 73%, राजस्थानमध्ये 70%, मध्य प्रदेशमध्ये 69% आणि गोव्यातील रिकव्हरी रेट 68% आहे.