खुशखबर!  Modi Government चा मोठा निर्णय; 'सुमन' योजनेंतर्गत सरकार करणार गर्भवती महिलांच्या प्रसूतीचा सर्व खर्च
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credits: PTI)

आता प्रसूतीदरम्यान उपचाराच्या अभावामुळे देशात कोणतीही महिला किंवा तिचे मूल दगावणार नाही. 100% सुरक्षित मातृत्व मिळवण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सरकारने सुमन (सुरक्षित मातृत्व विमा) नावाची नवीन योजना (Suman Scheme) सुरू केली आहे. रुग्णालय किंवा प्रशिक्षित परिचारिका यांच्या देखरेखीखाली देशात 100 टक्के प्रसूती करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या नवीन योजनेंतर्गत प्रत्येक गर्भवती महिलेला  सुरक्षित मातृत्वाची हमी दिली जाणार आहे.

या योजने अंतर्गत, गर्भवती महिलेस प्रसूतीपूर्वी चार वेळा विनामूल्य तपासणी करण्याचा अधिकार असेल, ज्यामध्ये स्त्रीसह गर्भाचे आरोग्य देखील तपासले जाणार आहे. एवढेच नव्हे तर, प्रसूतीपूर्वी महिलेला रुग्णालयात आणण्यासाठी व नंतर घरी परत जाण्यासाठी मोफत रुग्णवाहिका देखील देण्यात येणार आहे. प्रसुतिदरम्यान होणारा सर्व खर्च, ऑपरेशनसहित सरकार करणार आहे. प्रसुतिनंतर सहा महिन्यांसाठी आई व मुलाला मोफत औषधेही दिली जाणार आहेत. सोबतच एखाद्या नवजात मुलास कोणत्याही गंभीर आजाराने ग्रासले असल्यास, तिच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार उचलेल.

सर्व गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 'सेवा हमीपत्र' (Service Guarantee Charter) जाहीर केले आहे. दुर्गम भागातील गर्भवती महिलांपर्यंत पोहचण्यासाठी स्वयंसेवी गट, ग्रामस्तरीय आरोग्य व स्वच्छता समित्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. टोल-फ्री नंबर 102 किंवा 108 वर कॉल करून गर्भवती महिलेपर्यंत पोहोचण्यासाठी विनाशुल्क वाहन मागवले जाऊ शकते. (हेही वाचा: संतापजनक! पुण्यात चुकीचे उपचार दिल्याने गर्भवती महिला व नवजात अर्भकाचा मृत्यू; गुन्हा दाखल, डॉक्टर फरार)

दरम्यान, आतापर्यंत 80 टक्के प्रसूती रुग्णालयांमध्ये केल्या जात आहेत. त्यातील 52 टक्के सरकारी रुग्णालयात होत आहेत. पैशांच्या अभावामुळे प्रसुतिदरम्यान कोणतीही महिला रुग्णालयाच्या सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी सुमन अभियान प्रयत्न करणार आहे.