संतापजनक! पुण्यात चुकीचे उपचार दिल्याने गर्भवती महिला व नवजात अर्भकाचा मृत्यू; गुन्हा दाखल, डॉक्टर फरार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

पुण्याजवळील चाकण (Chakan) येथे, गर्भवती महिलेला चुकीची औषधे, गोळ्या दिल्याने या महिलेचा व नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाकण येथील अरगडे हॉस्पिटल (Argade Hospital) आणि क्रिटीकेअर हॉस्पिटल (Criticare Hospital) मधील डॉक्टरांकडून हे कृत्य घडले आहे. याप्रकरणी डॉ. अरगडे, क्रिटीकेअर हॉस्पिटलचे डॉ. घाटकर आणि डॉ. सुपेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 मे रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सपना पवळे यांना प्रसूतीसाठी अरगडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर चुकीचे उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेली इंजेक्शन, गोळ्यांमुळे सपना यांना त्रास होऊ लागला, म्हणून त्यांना क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे त्यांची प्रसूती होऊन मुलगी जन्माला आली, मात्र या अर्भकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान सपना यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना चिंचवड येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. (हेही वाचा: पिंपरी येथे दाताच्या शस्त्रक्रियेदरम्यान 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू; रुग्णालय प्रशासनाने जबाबदारी नाकारली)

याप्रकरणी सपना यांचे पती सुधीर मच्छिंद्र पवळे यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करत, अरगडे हॉस्पिटल व क्रिटीकेअर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संबंधित डॉक्टर फरार झाल्याची माहिती आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, अरगडे रुग्णालयात काही दिवसांपूर्वी आई आणि मुलाचा मृत्यू झाला होता, तसेच क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्येही योग्य उपचार दिले गेले नसल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तरी या डॉक्टरांचा परवाना तसाच चालू ठेऊन त्यांना प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्यात आली होती.