Medicines Representative Image (Photo Credits: Pixabay)

देशात आजपासून, म्हणजे 1 एप्रिलपासून 2025-26 हे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. अशात 1 एप्रिल 2025 पासून भारतात 900 हून अधिक आवश्यक औषधांच्या किंमतीत वाढ (Medicine Price Hike) झाली आहे. ही वाढ राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरण (NPPA) यांनी घाऊक किंमत निर्देशांक (WUPI) मधील बदलांनुसार लागू केली आहे. यामध्ये हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, आणि सामान्य आजारांवरील औषधांचा समावेश आहे, ज्यांचा दरडोई वापर मोठ्या प्रमाणात होतो. या किंमतवाढीमुळे, विशेषतः ज्यांना नियमित औषधे घ्यावी लागतात अशा सर्वसामान्य लोकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. सर्व अत्यावश्यक औषधांच्या किमती सरकारच्या नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीद्वारे निश्चित केल्या जातात. मागील वर्षाच्या घाऊक किंमत निर्देशांकनुसार दर दरवर्षी किमती बदलल्या जातात.

सरकारने ही वाढ वार्षिक महागाई दराशी संलग्न केली असून, औषध कंपन्यांना उत्पादन खर्च वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या यादीतील औषधे राष्ट्रीय आवश्यक औषध सूची (एनएलईएम) अंतर्गत येतात, ज्यामुळे त्यांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवले जाते. तरीही, ही वाढ सुमारे 1.74 टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगितले जाते, जे मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. महागाई आणि वाढत्या आरोग्य खर्चाशी झुंजणाऱ्या लाखो लोकांसाठी ही किंमत वाढ चिंतेचा विषय आहे. यामुळे निम्न आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भार पडेल असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, सरकारचा असा युक्तिवाद आहे की, औषध कंपन्यांना उत्पादन सुरू ठेवण्यासाठी ही वाढ आवश्यक होती. (हेही वाचा: CDSCO Drug Samples Quality Test: देशभरातील 103 औषधांचे नमुने गुणवत्ता चाचणीमध्ये अयशस्वी; तब्बल 38 एकट्या हिमाचल प्रदेशमधील)

महत्वाच्या औषधांच्या वाढलेल्या किंमती-

अहवालानुसार, 250 मिलीग्राम आणि 500 मिलीग्राम अँटीबायोटिक अ‍ॅझिथ्रोमायसिनची कमाल किंमत अनुक्रमे प्रति टॅब्लेट ₹11.87 आणि ₹23.98 असेल.

अमोक्सिसिलिन आणि क्लॅव्हुलेनिक अ‍ॅसिड असलेल्या ड्राय सिरपची किंमत प्रति मिली ₹2.09 निश्चित करण्यात आली आहे.

डायक्लोफेनाक (वेदना कमी करणारे औषध): प्रति टॅब्लेट कमाल किंमत ₹2.09 निश्चित करण्यात आली आहे.

इबुप्रोफेन (वेदना कमी करणारे औषध): 200 मिलीग्राम प्रति टॅब्लेट ₹0.72 आणि 400 मिलीग्राम प्रति टॅब्लेट ₹1.22.

मधुमेहावरील औषध (डॅपाग्लिफ्लोझिन + मेटफॉर्मिन हायड्रोक्लोराइड + ग्लिमापिराइड): प्रति टॅब्लेट सुमारे ₹12.74.

अ‍ॅसायक्लोव्हिर (अँटीव्हायरल): 200 मिलीग्राम प्रति टॅब्लेट ₹7.74 आणि 400 मिलीग्राम प्रति टॅब्लेट ₹13.90.

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन (मलेरियाविरोधी): 200 मिलीग्राम प्रति टॅब्लेट ₹6.47 आणि 400 मिलीग्राम प्रति टॅब्लेट ₹14.04.

दरम्यान, औषधांच्या किमतीत वाढ झाल्याबाबत केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत लेखी उत्तर दिले. त्यांनी म्हटले आहे की, औषध (किंमत नियंत्रण) आदेश, 2013 (डीपीसीओ, 2013) च्या तरतुदींनुसार, घाऊक किंमत निर्देशांक (WPI) (सर्व वस्तू) च्या आधारावर अनुसूचित औषधांच्या या कमाल किमती दरवर्षी सुधारित केल्या जातात. 1.4.2024 पासून, सर्व वस्तूंच्या घाऊक किंमत निर्देशांकातील (सर्व वस्तू) वार्षिक बदलाच्या आधारावर, 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित औषधांच्या कमाल किमती 0.00551 टक्क्यांनी वाढवण्यात आल्या. डीपीसीओ, 2013 च्या परिच्छेद 2(1)(यू) मध्ये परिभाषित केल्यानुसार, एनपीपीए नवीन औषधांच्या किरकोळ किमती देखील निश्चित करते.