Medicines प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credits-File Image)

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (CDSCO) ने फेब्रुवारी 2025 महिन्यातील औषधांच्या गुणवत्तेच्या तपासणीत 103 नमुने अपयशी ठरवले आहेत. यामध्ये प्रसिद्ध ब्रँड टेल्मा एचचा समावेश असून, त्याला 'खोटे' (Spurious) म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे. ​या 103 औषध नमुन्यांपैकी 47 नमुने केंद्रीय औषध प्रयोगशाळांनी आणि उर्वरित 56 नमुने विविध राज्यांच्या औषध प्रयोगशाळांनी अपयशी ठरवले आहेत. सर्दी, खोकला, फ्लू, अ‍ॅलर्जी आणि वेदनाशमनसह जीवनसत्त्वे आणि हृदयरोगासह औषधांचे नमुने फेल झाले आहेत.

ज्या राज्यांमधील औषधे चाचणीत अपयशी ठरली आहेत, त्यामध्ये केरळ, पुद्दुचेरी, तेलंगणा, जम्मू आणि काश्मीर, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, ओडिशा, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आसाम अशा काही राज्यांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, हिमाचल प्रदेशातील 38 औषध नमुने, ज्यामध्ये 10 इंजेक्शन्सचा समावेश आहे, गुणवत्तेच्या निकषांमध्ये अपयशी ठरले आहेत. हे नमुने विविध औषध कंपन्यांनी तयार केले असून, केंद्रीय औषध नियामकाने जारी केलेल्या मासिक अलर्टमध्ये यांचा समावेश आहे. ​ बहुतेक औषधांमध्ये धुळीचे कण आढळून आले आहेत. त्याच वेळी, मिस ब्रँडेड म्हणजेच लेव्हलमध्येही चुका आढळून आल्या आहेत. (हेही वाचा: OMG! शस्त्रक्रियेनंतर तब्बल 17 वर्षांपासून महिलेच्या पोटात राहिली कात्री; एक्स-रे केल्यानंतर उघडकीस आली धक्कादायक बाब, डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल)

औषध नमुन्यांच्या अपयशामागील काही प्रमुख कारणे:

असे काही गुणधर्म जे निर्धारित निकषांनुसार नाहीत.​

विघटन चाचणीत अपयश.​

पीएच मूल्यांमध्ये अनियमितता.​

वर्णनात विसंगती. ​

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना आणि राज्य औषध नियामक प्राधिकरणे नियमितपणे औषधांच्या गुणवत्तेची तपासणी करतात आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांना बाजारातून हटवण्यासाठी उपाययोजना करतात. औषध उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्तेची खात्री करण्याची जबाबदारी आहे, आणि गुणवत्तेच्या निकषांचे उल्लंघन आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.​ आताचे फेब्रुवारी 2025 चे निष्कर्ष औषधांच्या गुणवत्तेच्या नियंत्रणासाठी अधिक कठोर उपाययोजनांची गरज दर्शवतात, ज्यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेची हमी दिली जाऊ शकते.