Income Tax Department raided | (Photo credit: archived, edited, symbolic images)

बहुजन समाज पक्ष सुप्रीमो मायावती (Bahujan Samaj Party Supremo Mayawati) यांना लोकसभा निवडणुकीआधीच मोठा धक्का बसला आहे. मायावती यांचे माजी सचिव नेताराम ( Netram ) यांच्या घरावर आयकर विभाग (Income Tax Department) अधिकाऱ्यांनी छापा मंगळवारी टाकला. नेताराम हे मायावतींच्या बसपकडून लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत होते. दरम्यान, आयकर विभागाने त्यांच्या घरावर छापेमारी केली. प्राप्त माहितीनुसार नेताराम यांच्या दिल्ली ते लखनऊ अशा सुमारे 12 ठिकाणांच्या मालमत्तांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे.

दरम्यान, नेताराम यांना उत्तर प्रदेश राज्यातील एक धडाकेबाज आयएस ऑफिसर म्हणून ओळखले जाते. 2007 - 2012 या काळात मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असतानाच्या काळात नेताराम हे मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सचिव होते. त्या काळात नेताराम यांचा पक्षाच्या आमदार आणि खासदारांवर जोरदार वचक होता. इतका की, त्यांना भेटायचे असेल तर मुख्यमंत्री मायावती यांच्याप्रमाणे नेताराम यांचीही वेळ आमदार, मंत्री आणि खासदारांना घ्यावी लागत असे. प्राप्त माहितीनुसार, नेताराम यांच्या लखनऊ येथील घरातून काही लग्जरी कार जप्त करण्यात आल्या आहेत. (हेही वाचा, Lok Sabha Election 2019: काँग्रेससोबत आघाडी नाही, बहुजन समाज पक्ष सर्वेसर्वा मायवतींची घोषणा)

सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, लखनऊ येथील विपलखण्ड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत नेताराम आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेली बँक खाती सील करण्यात आली आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेताराम यांच्या कन्येच्या नावे असलेले एसबीआय बँकेतील खातेही सील केले आहे. कर चुकविल्याप्रकरणी आयकर विभागाने नेताराम यांच्या घरावर छापा टाल्यालचे समजते. आयकर विभागाच्या चौकशीनंतर काही केंद्रीय संस्थाही नेताराम यांची चौकशी करणार असल्याचे वृत्त आहे.