'मकरसंक्रांती'च्या तोंडावर तीळ महागले; भारतीय उत्पादन घटल्याने थेट आफ्रिकेतून आयात
Til Laddu (Photo Credits: Instagram)

Makarsankranti 2020: नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच मकरसंक्रांती, या सणाची खास ओळख म्हणजे तिळाचे लाडू (Sesame ladu) . तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत शेजारी पाजारी, कुटुंब, नातेवाईक यांना वाटण्यासाठी प्रत्येक घरात तिळाचे लाडू आवर्जून बनवले जातात. यंदा 15 जानेवारी रोजी मकरसंक्रांती असल्याने तुम्हीही आता येणाऱ्या शनिवार- रविवार मध्ये तिळाचे लाडू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काहीशी वाईट बातमी आहे. यंदा अवकाळी पाऊस, सतत बदलते तापमान यामुळे भारतातील तिळाचे उत्पादन घटले होते, परिणामी यंदा सणाच्या आधी थेट आफ्रिकेतून (Africa)  तिळाची आयात करण्यात आली आहे, साहजिकच हे आयात केलेले तीळ नेहमीपेक्षा बरेच महाग आहेत, सध्या प्रति किलो तीळा साठी साधारण 170-180  रुपये मोजावे लागत आहेत.  'मकर संक्रांत' नक्की का साजरी करतात; जाणून घ्या त्यामागचा इतिहास आणि महत्त्व

 प्राप्त माहितीनुसार, भारतीय तीळ उत्पादन घटल्याने उपलब्ध खरेदी केलेला माल हा बाजारात लगेचच विकला जातो, याचेही प्रमाण अवघे 10  ते 15 टक्के इतकेच आहे.अशातच थंडी मध्ये तिळाची वाढती मागणी पाहता अखेरीस आफ्रिकेतून तीळ आयात करण्याची वेळ आली आहे. 25 डिसेंबरपासून आफ्रिकेतील तीळ भारतीय बाजारपेठेत दाखल झाले आहेत. किरकोळ बाजारात सध्या या तिळाची किंमत अधिक असून यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याचे पूर्ण संकेत आहेत.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी तीळ उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक होता. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात हे चार तिळाचे उत्पादन घेणारे प्रांत आहेत. महाराष्ट्र, आंध्र व कर्नाटक येथे खरीप हंगामात तीळ घेतला जातो, तर तामिळनाडू राज्यात रब्बी हंगामात तीळ घेतला जातो. मात्र या सर्व ठिकाणी यंदा हवामानाचा फटका बसल्याने तिळाच्या उत्पादन व गुणवत्तेवर वाईट परिणाम झाला आहे.