
महाराष्ट्र सरकारने नुकताच एक क्रांतीकारी निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर मोठ्या शहरांमधील प्रवास अधिक सोपा, स्वस्त आणि पर्यावरणपूरक होणार आहे. महाराष्ट्रात बाईक पूलिंग (Bike Pooling) लवकरच कायदेशीर होणार आहे. याआधी राज्य सरकारने ई-बाइक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या नव्या धोरणांमुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल, प्रदूषणावर नियंत्रण येईल आणि सामान्य प्रवाशांना परवडणारा प्रवासाचा पर्याय मिळेल. विशेषतः 15 किलोमीटरपर्यंतच्या छोट्या अंतरासाठी हे धोरण फायदेशीर ठरणार आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 1 प्रिल रोजी ई-बाईक टॅक्सींना हिरवा कंदील देत, बाईक पूलिंगला मान्यता दिली.
या नवीन उपक्रमामुळे नियम तयार केल्यानंतर, खाजगी दुचाकी मालकांना भाड्याने राईड्स शेअर करण्याची परवानगी मिळेल. जरी याची पुष्टी झालेली नसली तरी, वाहतूक विभागातील काही अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, गोव्यासह इतर 12 राज्यांमध्ये बाईक टॅक्सी आधीच कार्यरत आहेत, मात्र बाईक पूलिंगला कायदेशीर मान्यता देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असू शकते.
महाराष्ट्रातील वाहनांची संख्या 4 कोटींपेक्षा जास्त झाली आहे आणि दरवर्षी 25 लाखांहून अधिक वाहने रस्त्यांवर जोडली जातात, ज्यामुळे वाहतूक कोंडी, वाहनांचे प्रदूषण आणि इतर समस्या वाढत आहेत. अलिकडेच, गुढीपाडव्याच्या सणादरम्यान, एका आठवड्यात राज्यातील आरटीओ कार्यालयांमध्ये सुमारे 87,000 वाहनांची नोंदणी झाली. अशा परिस्थितीमध्ये ई-बाईक टॅक्सी आणि बाईक पूलिंग असे पर्याय फायद्याचे ठरू शकतील. बाईक पूलिंग ही एक शेअर करण्यायोग्य वाहतूक व्यवस्था आहे, जिथे मोटारसायकल किंवा स्कूटर चालवणारे व्यक्ती त्याच दिशेने प्रवास करणाऱ्या इतरांसोबत राईड्स शेअर करतात.
उदाहरणार्थ, जर तुम्ही अंधेरीहून कुर्ल्याला जात असाल, तर तुम्ही त्या मार्गावरील दुसऱ्या प्रवाशासोबत तुमची राईड शेअर करू शकाल आणि त्यासाठी भाडे आकारू शकाल. यामुळे तुमचा इंधनाचा खर्च कमी होतो, आणि रस्त्यावरील वाहनांची संख्याही घटते. या धोरणानुसार, केवळ इलेक्ट्रिक दुचाकींनाच अशी राईड शेअर करण्यास परवानगी असेल. यासह त्यांच्याकडे मोटर वाहन कायद्यांतर्गत वैध परवाना, फिटनेस प्रमाणपत्र आणि विमा असणे बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त, या वाहनांमध्ये चालक किंवा मालक वगळता, राईड-शेअरिंग प्रवाशांसाठी किमान 5 लाख रुपयांचा विमा कव्हर असणे आवश्यक आहे. (हेही वाचा: Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेचा वेग मंदावला! वांद्रे-माहीम स्ट्रेचवर प्रवाशांना धीम्या गतीने प्रवास करावा लागणार)
महाराष्ट्र परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बाईक टॅक्सींसह, विभाग आता बाईक पूलिंगसाठी नियम तयार करेल. कायदेशीर विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर, सेवा सुरू होण्यापूर्वी नियम सूचित केले जातील. अॅप-आधारित अॅग्रीगेटर प्लॅटफॉर्मवर (बाईक पूलिंगसाठी) नोंदणी करण्यासाठी, (वाहन मालकाची) पोलीस पडताळणी अनिवार्य असेल. या धोरणानुसार, एका दुचाकीला दिवसाला शहरातील चार राईड आणि आठवड्याला दोन शहराबाहेरील राईड करण्याची मर्यादा आहे.