Robert Vadra | (Photo Credit- X/ANI)

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वढेरा (Robert Vadra) यांना हरियाणातील भूखंड व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात (Land Deal-linked Money Laundering Case) अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate - ED) चौकशीसाठी पाचारण केले होते. यानुसार मंगळवारी (15 एप्रिल) रॉबर्ट वढेरा ED च्या दिल्ली कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. ही कारवाई त्या दिवशी झाली, जेव्हा वढेरा यांनी राजकारणात प्रवेश करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांनी म्हटले होते की, काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परवानगी दिल्यास ते राजकारणात उतरण्यास तयार आहेत.

सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रॉबर्ड वाड्रा यांना गुरुग्रामच्या शिकोहपूर (Shikohpur) गावातील 2008 मधील भूखंड व्यवहारप्रकरणी प्रथमच चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ही कारवाई हरियाणा पोलिसांनी 2018 मध्ये दाखल केलेल्या FIR वरून सुरू करण्यात आलेल्या चौकशीतून पुढे आली आहे. (हेही वाचा, Smriti Irani vs Robert Vadra? प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्याकडून अमेठी येथून लोकसभा लढण्याचे संकेत; स्मृती इराणींसोबत लढत होण्याची शक्यता)

'भाजपकडून सूडबुद्धीने कारवाई'

दिल्लीतील ED कार्यालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना वढेरा म्हणाले, 'माझ्याविरुद्ध काहीच नाही. आशा आहे की, आज या प्रकरणाचा काहीतरी निष्कर्ष लागेल.' त्यांनी या चौकशीस 'राजकीय सूडबुद्धीची कारवाई' असे संबोधले आणि आरोप केला की, 'बीजेपी (BJP) मला राजकारणात येण्यापासून रोखण्यासाठी हे करत आहे.' वढेरा पुढे म्हणाले, 'मी देशाच्या बाजूने बोलतो तेव्हा मला थांबवले जाते, राहुललाही संसदेत बोलू दिले जात नाही. ही राजकीय सूडबुद्धी आहे. मला लोकांचा पाठिंबा आहे. लोक मला राजकारणात पाहू इच्छितात.' (हेही वाचा, National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र; 25 एप्रिल रोजी सुनावणी)

रॉबर्ड वड्रा यांनी आपल्या मुद्द्यावर ठाम राहात म्हटले की, जेव्हा मी राजकारणात यायची तयारी दर्शवतो, तेव्हा जुन्या मुद्द्यांना उगाळून मला थांबवण्याचा प्रयत्न होतो. या प्रकरणात काहीच नाही. गेल्या 20 वर्षांत मला 15 वेळा समन्स पाठवण्यात आले आणि प्रत्येकवेळी 10 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी झाली आहे. 23,000 कागदपत्रे गोळा करणे सोपे नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण फेब्रुवारी 2008 मधील एका भूखंड व्यवहाराशी संबंधित आहे, जेव्हा वढेरा यांची कंपनी स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड (Skylight Hospitality Pvt Ltd) ने ऑंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून (Onkareshwar Properties) 3.5 एकर जमिनीसाठी ₹7.5 कोटी देऊन खरेदी केली होती. आरोप आहे की, या जमिनीचे म्युटेशन फक्त 25 तासांत पूर्ण करण्यात आले होते.

रॉबर्ड वाड्रा यांची पुन्हा होणार चौकशी

याच संदर्भात, डिसेंबर 2023 मध्ये 'हिंदुस्तान टाईम्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अंमलबजावणी संचालनालयाने फरार शस्त्र विक्रेता संजय भांडारी (Sanjay Bhandari) आणि ब्रिटिश नागरिक सुमित छड्ढा (Sumit Chadha) यांच्याविरुद्ध वेगळ्या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. त्यावेळी ED ने असा दावा केला होता की, रॉबर्ट वढेरा आणि प्रियंका गांधी वढेरा (Priyanka Gandhi Vadra) यांनी दिल्लीतील एका प्रॉपर्टी एजंटमार्फत हरियाणातील अनेक भूखंड खरेदी केले होते. हाच एजंट NRI व्यावसायिक सीसी थंपी (CC Thampi) याला देखील जमीन विकत होता.

दरम्यान, रॉबर्ट वढेरा यांनी स्पष्टपणे सांगितले की, हे प्रकरण केवळ त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि राजकारणात येण्यापासून थांबवण्यासाठी उचललेले पाऊल आहे.