
बॉलिवूडचा दबंगस्टार अभिनेता सलमान खान (Actor Salman Khan) ला पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यावेळी त्याला गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. याबबतचा मेसेज वरळीच्या परिवहन विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबर वर आला होता. धमकीच्या मेसेज मध्ये सलमान खानला घरात घुसून मारण्याची भाषा वापरण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरूद्ध वरळी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस या धमकीमागील स्त्रोत कोण आहे? याचा शोध घेत आहेत.
सलमान खानला धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2018 पासून त्याला वारंवार धमक्या मिळाल्या आहेत. त्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सरकार कडून सलमानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे.
सलमान खान कडून त्याच्या खाजगी सुरक्षेमध्येही वाढ करण्यात आली आहे. त्याच्या घरात आता बुलेट प्रुफ ग्लास लावण्यात आली आहे. 1998 च्या काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानचा सहभाग असल्याच्या आरोपावरून बिष्णोई गॅंग सलमान खानला लक्ष्य करत असल्याचे वृत्त आहे. बिश्नोई समुदायासाठी या प्राण्याचे धार्मिक महत्त्व आहे.
2024 मध्ये, बिश्नोई गॅंग़कडून सलमानला पुन्हा धमकी देण्यात आली, ज्यामध्ये त्याने एकतर मंदिरात जाऊन काळवीट मारल्याच्या कथित घटनेबद्दल सार्वजनिकपणे माफी मागावी किंवा 5 कोटी रुपये द्यावे अशी मागणी करण्यात आली. 30 ऑक्टोबर रोजी, एका अज्ञात व्यक्तीने पुन्हा अभिनेत्याला धमकी दिली आणि 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे.