Hanging | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

विजेचे बिल (Electricity Bill) न भरल्याने विभागाने केलेल्या कारवाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा 35 वर्षीय शेतकरी पीठ गिरणीही चालवत होता. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) छतरपूरपासून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या मातगुवांमध्ये बुधवारी ही घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी शेतकर्‍याने एक सुसाईड नोट लिहिली आहे, ज्यात त्याने नमूद केले आहे की, ‘माझ्या मृत्यूनंतर माझे शरीर सरकारला द्या, जेणेकरून ते माझ्या शरीराचे अवयव विकून आपले कर्ज फेडून घेतील.’ वीज बिल न भरल्यामुळे कंपनीने त्याची पीठ गिरणी व मोटरसायकल जप्त केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

मृताचा भाऊ लोकेंद्र राजपूत यांनी सांगितले की, ‘माझा भाऊ मुनेंद्र राजपूत यांनी बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. वर्षाकाठी वीजबिल न भरल्यामुळे वीज विभागाने वॉरंट जारी करुन सोमवारी गिरणी व मोटरसायकल जप्त केली. यासह त्याचा अपमान करण्यात आला. तो विनंती करत राहिला की हे बिल भरण्यासाठी त्याला थोडा कालावधी मिळावा पण त्याचे म्हणणे ऐकले गेले नाही.’

कोरोनामुळे लागू करण्यात आलेले लॉक डाऊन त्यानंतर अनलॉकमध्येही गिरणीतून पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते. याच दरम्यान खरीप पीक झाले नाही. उदरनिर्वाह करण्यासाठी हा शेतकरी गिरणी चालवत होता मात्र तीदेखील जप्त करण्यात आल्याने त्याच्याकडे उत्पन्नाचा दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. लोकेंद्र म्हणाले की, या वर्षी गिरणी खूप कमी सुरू असतानाही विद्युत विभागाकडून रीडिंगऐवजी संपूर्ण वर्षाचे सरासरी बिल दिले गेले. जास्तीची बिले आणि पीक नसल्यामुळे मुनेंद्रकडे पैसे देण्यास काहीही साधन नव्हते. अशा परिस्थितीत त्याने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. (हेही वाचा: महाराष्ट्र: वेतन थकल्यामुळे रत्नागिरी आणि जळगाव मध्ये एसटी कर्मचा-याची आत्महत्या)

मुनेंद्र राजपूत यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, ‘मला तीन मुली आणि एक मुलगा आहे. कोणीही 16 वर्षांपेक्षा मोठा नाही. माझ्या कुटूंबाला विनंती आहे की माझ्या मृत्यूनंतर माझे शरीर शासनाकडे सोपवावे, जेणेकरून माझ्या शरीराचा प्रत्येक भाग विकला जाऊ शकेल आणि सरकारच्या कर्जाची परतफेड करता येईल. माझ्या एका म्हशीचा करंट लागून मृत्यू झाला, तीन म्हशी चोरीला गेल्या, आषाढ महिन्यात खरीप पीक आले नाही. लॉक डाऊनमध्ये कोणतेही काम झाले नाही. गिरणीचे काम बंद होते त्यामुळे आम्ही बिल भरू शकलो नाही.’