महाराष्ट्र: वेतन थकल्यामुळे रत्नागिरी आणि जळगाव मध्ये एसटी कर्मचा-याची आत्महत्या
ST Bus Staff Suicide (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राची ओळख असलेली लालपरी म्हणजेच एसटी बस सध्या प्रचंड तोट्यात आहे. त्यामुळे एसटी कर्मचा-यांचे पगार देखील थकले आहेत. एसटी कर्मचा-यांना (ST Staff) मागील 3 महिन्यांपासून वेतन रखडले आहे. यामुळे एसटी कर्मचारी चिंतेत आहेत. यातच आज राज्यात एसटी कर्मचा-यांकडून आक्रोश आंदोलन करत आहेत. दरम्यान रत्नागिरी (Ratnagiri) आणि जळगावातील (Jalgaon) एसटी कर्मचा-याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. रत्नागिरी डेपोत काम करणा-या या एसटी चालकाचा मृतदेहर त्याच्या भाड्याच्या घरात आढळला तर जळगावातील एसटी कर्मचा-याने सुसाईड नोट (Suicide Note) लिहून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

रिपोर्टनुसार, रत्नागिरीतील आत्महत्या केलेल्या एसटी चालकाचे नाव पांडुरंग गडदे आहे. गेल्या काही महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. तर दुसरीकडे जळगावमध्ये आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचा-याने तर सुसाईड नोट लिहून आपल्या या कृत्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. पगार वेळेवर न मिळाल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सुसाईड नोट मध्ये म्हटले आहे. हेदेखील वाचा-Aakrosh Aandolan: एसटी बस चालक, वाहकांचे आज 'आक्रोश आंदोलन'; दिवाळी तोंडावर अजूनही 3 महिन्यांचा पगार थकीत

सातत्याने पगारात अनियमितता आल्याने घर कसे चालवायचे असा मोठा प्रश्न एसटी कर्मचा-यांसमोर उभा राहिला आहे. त्यात दिवाळीही तोंडावर आली असताना त्यांचे भविष्य त्यांना अंधारातच दिसत आहे. म्हणूनच या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढला जावा यासाठी आज महाराष्ट्रात आक्रोश आंदोलन होत आहे. एसटी महामंडळ कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांसोबत घराखालीच 'आक्रोश आंदोलन' (Aakrosh Aandolan) करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर एसटीच्या एका संघटनेने पगार न झाल्यास दिवाळीच्या पहिल्या दिवशी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.