ST Bus | (Photo Credit: MSRTC)

महाराष्ट्रामध्ये लालपरी म्हणून ओळख असलेली एसटी बस (ST Bus) सध्या तोट्यामध्ये आहे. दरम्यान एसटी महामंडळाचे चालक आणि वाहक यांना मागील 3 महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने आता ते आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळ आणि राज्य सरकारने त्यांचे थकीत वेतन 7 नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीपूर्वी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र 7 तारीख उलटून गेली असली तरीही खात्यात पगार नसल्याने अनेकांसमोर आर्थिक संकट आहे. अशामध्ये आज एसटी महामंडळ आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत. आज एसटी महामंडळ कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांसोबत घराखालीच 'आक्रोश आंदोलन' (Aakrosh Aandolan) करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर एसटीच्या एका संघटनेने पगार न झाल्यास दिवाळीच्या पहिल्या दिवशी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. MSRTC Extra Rounds Of Buses: एसटी महामंडळ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत बसेसच्या दररोज 1 हजार जादा फेऱ्या वाढवणार.

एसटी महामंडळाकडून चालक, वाहक कर्मचार्‍यांना मात्र अजूनही सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे. आंदोलनात सहभागी होत कामबंद केल्यास शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते असे सांगण्यात आले आहे. दरम्यान दिवाळीपूर्वी पगार न दिल्यास कोर्टात जाण्याची तयारी देखील केल्याचं एसटी महामंडाळाच्या कर्मचार्‍यांनी सांगितले आहे.

एसटी महामंडळ आधीपासूनच तोट्यामध्ये होते. त्यामध्ये आता कोरोना वायरसमुळे भर पडली आहे. लॉकडाऊनच्या काळात एसटीची सेवा प्रवाशांसाठी पूर्णपणे ठप्प होती. नंतर हळूहळू एसटी सुरू झाली असली तरीही प्रवाशांचा अजूनही एसटीने प्रवास करण्याला अपेक्षित प्रतिसाद नाही. त्यामुळे एसटीला आर्थिक तोटा आहे. काही दिवसांपूर्वीच अनिल परब यांनी कर्ज काढून कर्मचार्‍यांचे वेतन दिले जाईल असे म्हटले होते.