आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका (Lok Sabha Election 2024) सुरळीत पार पडण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एक ॲप लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोग 'C-VIGIL: Citizens Be Vigilant' नावाचे ॲप्लिकेशन लॉन्च करणार आहे. निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, असे कुमार म्हणाले. या ॲपच्या मदतीने हिंसाचार रोखण्यास मदत होणार आहे. ते पुढे म्हणाले की, निवडणुकीशी संबंधित कोणतीही अनियमितता किंवा हिंसाचार होत असल्यास या ॲपद्वारे त्याची तक्रार करता येईल. तक्रार केल्यानंतर त्याबाबत 100 मिनिटांत कारवाई केली जाईल.
जर कोणत्याही उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर या ॲप्लिकेशनचा उपयोग त्या उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी आणि त्याच्यावरील गुन्हेगारी आरोपांसाठी केला जाऊ शकतो. राजीव कुमार यांनी पश्चिम बंगालमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मंगळवारी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. राज्यात मुक्त, निष्पक्ष आणि हिंसाचारमुक्त निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि परिणामकारक होण्यासाठी भारत निवडणूक आयोग नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे कुमार म्हणाले. या संदर्भात, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी हे ॲप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारत निवडणूक आयोगाने देशातील अनेक राज्यांमध्ये या ॲपद्वारे प्रभावी कारवाई केली आहे. या ॲपद्वारे आता आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारींवर निर्धारित वेळेत कारवाई करणे शक्य होणार आहे.
#WATCH | Kolkata, West Bengal: Chief Election Commissioner Rajiv Kumar says, "Election Commission is going to launch an application called 'C-Vigil: Citizens be Vigilant'. If any preparations for any election-related irregularity or violence are being made. Users will be able to… pic.twitter.com/59VMl6xSvE
— ANI (@ANI) March 5, 2024
कोणीही त्यांच्या मोबाईल फोनवर सी-विजिल ॲप डाउनलोड करू शकतो. जर कुठेही निवडणुकीदरम्यान हिंसाचार किंवा गैरप्रकार होत असेल, तर नागरिक या आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या क्रियाकलापांचे थोडक्यात वर्णन करणारा फोटो किंवा 2 मिनिटांच्या व्हिडिओद्वारे तक्रार करू शकतात. तक्रार दाखल करताना त्याबाबत थोडी माहिती नौद करा. त्यानंतर ही तक्रार संबंधित जिल्हा नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचेल, परिणामी काही मिनिटांतच पथक घटनास्थळी पाठवले जाईल आणि कारवाईची खात्री केली जाईल. (हेही वाचा: Justice Abhijit Gangopadhyay Will Join Bjp: न्यायदान सोडून राजकारणाच्या प्रेमात, हायकोर्टाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांचा राजीनामा; भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची शक्यता)
या ॲपची सर्वात खास गोष्ट म्हणजे तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवण्याचा पर्याय आहे. 'सी-व्हिजिल' ॲपद्वारे मोफत वस्तूंचे वितरण, पैशांचे वितरण, जातीय द्वेषयुक्त भाषण, द्रव आणि औषधांचे वितरण, बनावट बातम्या, अग्निशस्त्र प्रदर्शन आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित इतर तक्रारी केल्या जाऊ शकतात. कुमार पुढे म्हणाले, निवडणुकीत भीतीला स्थान नाही. नोकरशहांना निष्पक्ष राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. निवडणुकीवेळी राज्यात पुरेशा प्रमाणात केंद्रीय दलेही तैनात करण्यात येतील, असेही ते म्हणाले.