भारतातील विविध शहरं ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी ओळखली जातात. प्रत्येक शहरांमध्ये लोकांना मिळणारी वागणूक यावर एक सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यावरुन आयआयटी बॉम्बे (IIT-Bombay) च्या संशोधकांनी एक यादी जारी केली आहे. ज्यात देशातील वेगवेगळ्या शहरांमधील लोकांची रियालिटी लाईफचे परिक्षण करण्यात आले असून त्यानुसार शहरांच्या सुरक्षिततेबाबत क्रमवारी जारी करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी ही यादी तयार करताना महिलांना मिळालेली वागणूकही लक्षात घेण्यात आली आहे. या यादीमध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून चेन्नई (Chennai) प्रथम क्रमांकावर आहे. तर पटना (Patna) शहर शेवटच्या स्थानावर आहे.
महिलांना मिळणारी सुरक्षितता इंदोर, दिल्ली आणि जयपूर या शहरांमध्ये अत्यंत कमी आहे. त्यामानाने मुंबई, भोपाल आणि लखनऊ या शहरांमध्ये महिलांची सुरक्षितता अधिक आहे. वेगवेगळ्या पैलूंनुसार तयार करण्यात आलेल्या 14 शहरांच्या यादीमध्ये मुंबई प्रथम स्थानावर असून दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे.
विशेष म्हणजे या यादीत पहिल्यांदाच लैगिंक समानतेचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. लैगिंक समानतेबाबत इंदौर, जयपूर आणि पटना सरासरीपेक्षा खूपच कमी आहेत. प्रत्येक शहरांमध्ये महिलांना वेगवेगळा अनुभव येतो. महिलांच्या मुलभूत गरजा पूर्ण होणे गरजेचे असते, असे एका अहवालात म्हटले आहे. महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांमध्ये जयपूरचा प्रथम क्रमांक लागतो. तर चेन्नईमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण सर्वात कमी आहे.
महिला आणि पुरुषांमधील साक्षरतेची दरी ही जयपूर मध्ये सर्वाधिक (13.2 टक्के) इतकी आहे. तर कोलकातामध्ये सर्वात कमी (5.4 टक्के) इतके आहे. महिलांमधील बेरोजगारीचे प्रमाण पटना शहरांत सर्वाधिक आहे. (Lockdown: मुंबई, पुणे नंतर लॉकडाऊन काळात सर्वात टेन्शनमध्ये कोण? पाहा काय सांगतोय TRA रिसर्च)
शहरांमध्ये राहणाऱ्यांसाठी सर्वात मुलभूत गरजा म्हणजे विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा आणि शिक्षण. पटना शहरातील केवळ 36 टक्के लोकांनाच नळाद्वारे पाणी पुरवठा होतो. भारतात सर्वाधिक साक्षरता पुणे शहरामध्ये 91 टक्के इतकी आहे. तर सर्वात कमी हैद्राबाद मध्ये 83 टक्के इतकी आहे.