TRA Mental Wellbeing Research: टीआरए (TRA) संस्थेच्या कोविड मेंटल वेलबीइंग इंडेक्स विभागने नुकताच एक सर्वे केला. या सर्वेतील अहवालात पुढे आलेली निरिक्षणं अत्यंत धक्कादायक आहेत. संपूर्ण भारतात लॉकडाऊन (Lockdown) काळात मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) या दोन शहरांतील नागरिक ताण-तणावाखाली राहण्यात अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर, कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन या दुहेरी आव्हानांचा सामना गुवाहाटी आणि दिल्ली या शहारांतील नागरिक अधिक उत्तम प्रकारे करत आहेत. टीआरए रिसर्स या कन्झ्युमर इन्साइट्स आणि ब्रँड अनॅलिटीक्स कंपनीने देशभरातील 16 शहरांमध्ये 902 शहरी नागरिकांचा सर्वे करुन एक अहवाल तयार केला. या अहवालात हे वास्तव पुढे आले. सर्वेक्षण करताना नागरिकांच्या मेंटल वेलबीइंग म्हणजेच सध्याच्या संकटाशी संबंधित असलेल्या चिंता हाताळण्याची क्षमतेवर भर देण्यात आला.
मेंटल वेलबीइंग काय?
टीआरए रिसर्च मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौली सांगतात की, या सर्वेक्षणाच्या बाबतीत मेंटल वेलबीइंग म्हणजे सध्यास्थितीत असलेल्या संकटाचा सामना करताना नागरिकांची चिंता हाताळण्याची क्षमता. चिंताचा, आव्हानांचा सामना करण्याची क्षमता ही व्यक्तीच्या मानसिकतेवर आधारीत असते. ही क्षमता कशी आहे याचा अभ्यास या सर्वेतून करण्यात आला. आजघडीला संपूर्ण देशाच्या तुलनेत कोविड 19 आजाराचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरात आहेत. त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यामुळे या आजाराचा सामना करण्याच्या बाबतीत लोकांच्या मेंटल वेलबीइंगवर परिणाम झालेला असू शकतो, असे एन. चंद्रमौली सांगतात.
शहरांचा मेंटल वेलबीइंग स्कोअर
- मेंटल वेलबीइंग स्कोअर टक्केवारीत सांगायचे तर गुवाहाटी सर्वात अव्वल आहे. मेंटल वेलबीइंग स्कोअर मध्ये कोरोना व्हायरस, लॉकडाऊन त्यामुळे कुटुंबीयांचे आरोग्य, कामाच्या बाबतीतील स्थिरता, देशाच्या आरोग्यावर आणि अर्थकारणावर होणारा परिणाम यांबाबत निरिक्षणं नोंदविण्यात आली. यात गुवाहाटी शहराचा स्कोअर 84% इतका होता.
- गुवाहाटी दिल्ली-एनसीआर शहराचा स्कोअर 78% इतका आहे. तर त्यानंतर इंदोर कोइम्बतूर पुणे या शहरांतील नागरिकांची मेंटल वेलबीइंगची ‘चांगली’ या सदरात मोडते. या शहरांचा मेंटल वेलबीइंग स्कोअर अनुक्रमे 75%, 73%, 72% इतका आहे.
- धक्कादायक म्हणजे मुंबई शहरातील मेंटल वेलबीइंग स्कोअर 28% इतका आहे. मुंबईतील शहरांमधील नागरिकांना कुटुंबाचे आरोग्य, नोकरी, पर्यावरण आणि इतर कारणांमुळे तीव्र स्वरुपाचा ताण जाणवतो. मुंबईनंतर लखनऊ शहर हे मेंटल वेलबीइंग स्कोअरमध्ये खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे. या शहराचा स्कोअर 36% इतका आहे. (हेही वाचा, Lockdown: नियोजन न करता लॉकडाऊन लागू केल्याने बेरोजगारीत वाढ: काँग्रेस)
दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाचा सामना करताना लॉकडाऊन स्थिती असल्यामुळे अनेक नागरिकांना आपली नोकरी, आरोग्य आणि कुटुंबाची चिंता सतावते. तर काही नागरिकांना आपल्या कर्जाचे हप्ते, गुंतवणूक, उद्योग आणि शिक्षण आदी गोष्टींची चिंता सतावाताना दिसते आहे.