Kedarnath Dham

केदारनाथ (Kedarnath) मंदिर चार धाम यात्रेतील एक महत्त्वाचे ठिकाण आहे, ज्यामध्ये बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री यांचा समावेश होतो. हे उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील 3,583 मीटर (11968 फूट) उंचीवर असलेल्या 12 पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मंदिर वर्षातून अक्षय्य तृतीया (एप्रिल-मे) ते दिवाळी (ऑक्टोबर-नोव्हेंबर) पर्यंत सुमारे 6 ते 7 महिने भाविकांसाठी खुले असते आणि या हंगामात दरवर्षी सुमारे 20 लाख भाविक इथे भेट देतात. आता केंद्र सरकारने सोनप्रयाग ते केदारनाथ पर्यंत 12.9 किमी रोपवे प्रकल्पाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. हा प्रकल्प डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (डीबीएफओटी) अर्थात संरचना, बांधकाम, वित्तपुरवठा, कार्यान्वयन आणि हस्तांतरण पद्धतीने विकसित केला जाईल आणि यासाठी एकूण 4,081.28 कोटी रुपये भांडवली खर्च येईल.

हा रोपवे सार्वजनिक-खाजगी भागीदारीत विकसित करण्याचे नियोजित आहे आणि तो सर्वात प्रगत ट्राय-केबल डिटेचेबल गोंडोला (3एस) तंत्रज्ञानावर आधारित असेल, ज्याची डिझाइन क्षमता प्रति तास 1,800 प्रवासी प्रति दिशा (पीपीएचपीडी) असेल आणि दररोज 18,000 प्रवासी याचा लाभ घेतील. हा रोपवे प्रकल्प केदारनाथला भेट देणाऱ्या यात्रेकरूंसाठी एक वरदान ठरेल कारण तो पर्यावरणपूरक, सुकर आणि जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि एकतर्फी प्रवासाचा वेळ सुमारे 8 ते 9 तासांवरून सुमारे 36 मिनिटांपर्यंत कमी करेल.

या रोपवे प्रकल्पामुळे बांधकाम आणि कामकाजादरम्यान तसेच आतिथ्य, प्रवास, अन्न आणि पेये (एफ अँड बी) आणि पर्यटन यासारख्या संलग्न पर्यटन उद्योगांमध्ये वर्षभर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. रोपवे प्रकल्पाचा विकास हा संतुलित सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यात, डोंगराळ प्रदेशात शेवटच्या मैलापर्यंत संपर्क वाढविण्यात आणि जलद आर्थिक विकासाला चालना देण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

केदारनाथ मंदिरापर्यंतच्या प्रवासात गौरीकुंडपासून 16 किमीचा चढाईचा एक आव्हानात्मक मार्ग आहे आणि सध्या हा प्रवास पायी किंवा घोड्यावरून, पालखी आणि हेलिकॉप्टरद्वारे केला जातो. मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंना सुविधा देण्यासाठी आणि सोनप्रयाग आणि केदारनाथ दरम्यान बारमाही संपर्क व्यवस्थेची खातरजमा करण्यासाठी प्रस्तावित रोपवेची योजना आहे. (हेही वाचा: Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेची तारीख निश्चित; यंदा 3 जुलै पासून भाविक घेऊ शकतात बाबा बर्फानी यांचे दर्शन)

दरम्यान, केदारनाथ मंदिर उत्तर भारतीय हिमालयीन मंदिर स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. मुख्य मंदिराच्या गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग आहे, जे त्रिकोणी आकाराचे आहे. मंदिराच्या सभामंडपात पांडवांची, पार्वतीची आणि अन्य देवतांची मूर्ती आहेत. मंदिराच्या मागील बाजूस आदि शंकराचार्यांची समाधी आहे, ज्यांनी 8व्या शतकात या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानले जाते. केदारनाथ मंदिराच्या भेटीने आध्यात्मिक शांती आणि हिमालयाच्या नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव मिळतो, ज्यामुळे ते श्रद्धाळू आणि पर्यटक दोघांसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे.