Katchatheevu Island Issue: इंदिरा गांधींनी श्रीलंकेला दिले भारताचे कच्चाथीवू बेट? RTI मधून झाला मोठा खुलासा; PM Modi यांनी साधला कॉंग्रेसवर निशाणा
Katchatheevu Island (Photo Credit- Wikipedia)

Katchatheevu Island Issue: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तामिळनाडूतील कच्चाथीवू बेट (Katchatheevu Island) श्रीलंकेला देण्यात आल्याचे प्रकरण तापले आहे. आरटीआयमधून मिळालेल्या उत्तरावरून असे दिसून आले आहे की, 1974 मध्ये तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने एका करारानुसार भारताचे कच्चाथीवू बेट श्रीलंकेला दिले होते. अधिकृत दस्तऐवज आणि संसदीय नोंदी हे उघड करतात की, तत्कालीन भारत सरकारने पाल्क सामुद्रधुनीतील एका बेटावरील नियंत्रणाची लढाई एका लहान देशासोबत हरली होती. श्रीलंका (तेव्हाचे सिलोन) सरकारने हे बेट हिसकावण्याचे सर्व प्रयत्न केले होते, ज्याच्यासमोर इंदिरा गांधी सरकार झुकले होते.

आरटीआयच्या माध्यमातून कच्चाथीवू बेटाबाबतचा हा खुलासा झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कच्चाथीवू हे बेट हिंद महासागरात श्रीलंका आणि दक्षिण भारतादरम्यान आहे. येथे दररोज ज्वालामुखीचा उद्रेक होतो, त्यामुळे येथे कोणीही राहत नाही. कागदपत्रांनुसार, हे बेट भारतीय किनारपट्टीपासून सुमारे 20 किमी अंतरावर आहे. त्याचा आकार 1.9 चौरस किमी आहे.

स्वातंत्र्यापूर्वी कच्चाथीवू बेट भारताच्या अखत्यारीत होते आणि त्यावर श्रीलंका आपला हक्क सांगत असे. 1974 मध्ये इंदिरा गांधींनी एका करारानुसार हे बेट श्रीलंकेला सुपूर्द केले होते. ही बाब आरटीआयद्वारे उघड झाली आहे. तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी या बेटाबाबत आरटीआय अर्ज दिला होता. त्यानंतर आता सत्ताधारी पक्षाने कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.

अहवालानुसार 10 मे 1961 रोजी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कच्चाथीवू बेटाबाबत भारत आणि श्रीलंका यांच्यातील वादाचा मुद्दा अप्रासंगिक म्हणून फेटाळून लावला होता. ‘मला या छोट्या बेटाची अजिबात किंमत नाही आणि त्यावर माझा हक्क सोडण्यास मला अजिबात संकोच वाटणार नाही. हा वाद अनिश्चित काळासाठी चालू राहावा आणि संसदेत पुन्हा उपस्थित व्हावा, हे मला आवडत नाही’, असे ते म्हणाले होते.

आता पंतप्रधान मोदींनी रविवारी आपल्या एका ट्विटमध्ये याचा उल्लेख केला. त्यांनी लिहिले की, ‘ही डोळे उघडणारी आणि धक्कादायक गोष्ट आहे. काँग्रेसने #Katchatheevu कसा निर्दयीपणे सोडला ही बाब नवीन तथ्यामधून समोर आली आहे. याचा राग प्रत्येक भारतीयाला आहे आणि आपण काँग्रेसवर कधीच विश्वास ठेवू शकत नाही हे लोकांच्या मनात रुजले आहे. भारताची एकता, अखंडता आणि हित कमकुवत करणे ही काँग्रेसची 75 वर्षांपासूनची परंपरा आहे.’ (हेही वाचा: Congress Criticizes Modi Govt:1 एप्रिलपासून 800 हून अधिक औषधे महागणार; ‘महंगाई मैन मोदी’ म्हणत काँग्रेसची मोदी सरकारवर टीका)

दरम्यान, इंदिरा गांधींनी हे बेट श्रीलंकेला दिले तेव्हा तामिळनाडूत सर्वाधिक विरोध झाला होता. तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांनी याला कडाडून विरोध केला होता. 1991 मध्ये तामिळनाडू विधानसभेत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला होता. प्रस्तावात ते बेट परत करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहोचले होते.