Karnataka: काय सांगता? फळ विक्रेत्याने खरेदी केला तब्बल 6.5 लाखाचा नारळ; जाणून घ्या काय आहे खास
coconut (Photo Credits: Pixabay)

भारतात, लोकांच्या मनात देवाबद्दल प्रचंड श्रद्धा आहे व त्याला काही मर्यादा नाही. अशी भक्ती आणि भक्तासंबंधी आपण अनेक उदाहरणे पाहिली असतील. आता असेच एक प्रकरण कर्नाटकातून (Karnataka) समोर आले आहे. तर एका नारळासाठी (Coconut) तुम्ही किती रुपये खर्च कराल? 30 रुपये? 50? जास्तीत जास्त 100 रुपये. मात्र कर्नाटकातील एका मंदिरात एका व्यक्तीला ‘भाग्यवान नारळ’ प्राप्त करण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने तब्बल 6.5 लाखांची बोली लावून तो नारळ विकत घेतला. हे मंदिर बागलकोट (Bagalkot) जिल्ह्यातील जमखंडी शहराजवळ चिक्कलकी गावात आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. हा नारळ खरेदीदार विजयपुरा जिल्ह्यातील टिककोटा गावातील फळ विक्रेता आहे. भगवान मलिंगराया (Malingaraya Temple) हे शिवाच्या नंदीचे रूप मानले जाते आणि त्यांच्या जवळ ठेवलेला हा नारळ दैवी मानला जातो. असे म्हणतात की, हा नारळ जो कोणी प्राप्त करतो त्याला सौभाग्य प्राप्त होते. तर श्री बिरलिंगेश्वर यात्रेचा भाग म्हणून श्रावणातील शेवटच्या दिवशी मंदिर समितीने नारळाचा लिलाव केला होता. लिलावात अनेक भाविकांचा सहभाग होता, मात्र कोणाचीही बोली या विजयपुरा जिल्ह्यातील फळ विक्रेते महावीर हरके यांच्याजवळ पोहचू शकली नाही.

मंदिर समिती बऱ्याच काळापासून या विशेष नारळाचा लिलाव करत आली आहे, मात्र कधीही त्याला 10,000 रुपयांपेक्षा जास्त बोली मिळाली नाही. मात्र, यंदाची गोष्ट वेगळी होती. बोली 1000 रुपयांपासून सुरू होऊन लगेच 1 लाख रुपयांच्या पुढे गेली. त्यानंतर एका भाविकाने 3 लाख रुपये देऊ केले. या विशेष नारळासाठी इतकी किंमत यापूर्वी कधीही दिली गेली नव्हती. मंदिर समिती सदस्यांना बोली येथेच संपेल असे वाटले, इतक्यातच महावीर यांनी बोलीची रक्कम दुप्पट करून 6.5 लाख केली.

या वर्षीची बोली जिंकणाऱ्या महावीरने सांगितले की, त्यांचा निर्णय कदाचित विचित्र किंवा याला अंधश्रद्धा म्हटले जाऊ शकते, परंतु ही त्यांच्यासाठी भक्ती आणि श्रद्धेची बाब आहे. मंदिर समितीने सांगितले की, नारळाच्या बोलीतून मिळालेला पैसा मंदिराच्या विकासासाठी आणि इतर धार्मिक कामांसाठी वापरला जाईल.