उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) कडाक्याच्या थंडीने (Cold) कहर केला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अशात राज्यातील कानपूर (Kanpur) जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. येथील कडाक्याच्या थंडीमुळे हृदयरुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याची माहिती आहे. गेल्या 8 दिवसांत हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकमुळे तब्बल 114 जणांचा मृत्यू झाल्याचा दावाही केला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलपीएस हृदयरोग संस्थेने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
कार्डिओलॉजी इन्स्टिट्यूटनुसार, गेल्या एका आठवड्यात एकूण 4862 रुग्णांना संस्थेत दाखल करण्यात आले होते, त्यापैकी 98 रुग्णांचा एकतर रुग्णालयात मृत्यू झाला किंवा रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोकने मरण पावलेल्यांमध्ये असे 18 रुग्ण आहेत ज्यांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी होते. 40 ते 60 वर्षे वयोगटातील 30 रुग्णांचा मृत्यू झाला तर 50 रुग्ण 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे होते. कानपूरमध्ये थंडीमुळे हृदयविकाराचा झटका आणि मेंदूच्या झटक्याने मृत्यूची मालिका अजूनही सुरूच आहे. शुक्रवारी या रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये 78 तर इमर्जन्सीमध्ये 547 रुग्ण आले होते.
इंडिया टुडेशी संबंधित सिमर चावला यांच्या रिपोर्टनुसार, कानपूर कार्डिओलॉजी हॉस्पिटलने सांगितले की, केवळ 7 जानेवारीला हृदयविकाराच्या झटक्याने 14 लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये 6 जणांनी उपचारादरम्यान जीव गमावला, तर हृदयविकाराच्या झटक्याने 8 जणांचा मृत्यू झाला. त्याच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने 54 रुग्णांना दाखल करण्यात आले. शहरातील एसपीएस हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये गेल्या 24 तासांत 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हृदयरोग संस्थेत एकूण 604 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
एकूण मृत 114 रूग्णांपैकी 54 रूग्ण रूग्णालयात तर 60 रूग्ण रूग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मरण पावले. लखनऊमधील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या एका प्राध्यापकाने सांगितले की, या थंडीच्या मोसमात हृदयविकाराचा झटका फक्त वृद्धांपुरताच मर्यादित नाही. किशोरवयीन मुलांनाही हृदयविकाराचा झटका आला आहे, अशी प्रकरणे समोर आली आहेत. हिवाळा हा हृदयरोग्यांसाठी धोकादायक असतो, अशा परिस्थितीत, हिवाळ्यात स्वतःचे संरक्षण करणे आणि आवश्यक असेल तेव्हाच बाहेर जाणे महत्वाचे आहे. (हेही वाचा: गर्भवती महिलेला खांद्यावर घेऊन भारतीय जवानांनी दाखल केले रुग्णालयात, पाहा व्हिडिओ)
दरम्यान, इंडियन हार्ट असोसिएशनच्या मते, भारतातील हृदयविकाराच्या झटक्यांपैकी सुमारे 50 टक्के प्रकरणे 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये आणि 25 टक्के 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये आढळतात. डब्ल्यूएचओच्या मते, भारतातील शहरांमध्ये राहणा-या 12 टक्के आणि खेड्यांमध्ये राहणा-या सुमारे 10 टक्के लोकांना हृदयविकाराच्या समस्या आहेत. देशातील एकूण मृत्यूंपैकी 28 टक्के मृत्यू हृदयविकारामुळे होतात. हृदयविकाराच्या झटक्याने दरवर्षी सुमारे 20 लाख लोकांचा मृत्यू होतो. देशात दर 7 मिनिटांनी हृदयविकाराच्या 2 रुग्णांची नोंद होते. अशा परिस्थितीत तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.