एन व्ही रामण्णा । twitter and Wikimedia Commons

आज भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind)  यांनी नवे सरन्यायाधीश (Chief Justice of India) म्हणून एन व्ही रामण्णा (Justice NV Ramana) यांच्या नियुक्तीचे आदेश पारित केले आहेत. न्यायाधीश रामण्णा येत्या 24 एप्रिल 2021 पासून पदभार स्वीकारणार आहेत. सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे (SA Bobade) 23 एप्रिल दिवशी सेवानिवृत्त होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान बोबडे यांनीच काही दिवसांपूर्वी रामण्णा यांच्या नावाची शिफारस सरकारकडे पाठवली होती. त्यानंतर आज त्यावर राष्ट्रपतींकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 24 एप्रिलला आता बोबडे यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश म्हणून रामण्णा यांच्याकडे सरन्यायाधीश हे पद सोपवण्यात येणार आहे. 48 वे सरन्यायाधीश म्हणून त्यांचा शपथविधी पार पडेल. त्यांचा कार्यकाळ 26 ऑगस्ट 2022 पर्यंत असणार आहे.

कोण आहेत एन व्ही रामण्णा

आंध्रप्रदेशात एका शेतकरी कुटुंबात रामण्णा यांचा जन्म 27 ऑगस्ट 1957 दिवशी झाला. 10 फेब्रुवारी 1983 पासून त्यांनी वकिली सुरू केली. त्यांनी आंध्र प्रदेशच्या कोर्टापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये काम केले आहे. 27 जून 2000 ला रामण्णा यांची आंध्र प्रदेशच्या न्यायालयामध्ये परमनंट न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. 10 मार्च ते 20 मे 2013 या काळामध्ये त्यांनी चीफ जस्टीस ऑफ आंध्र प्रदेश हाय कोर्ट मध्ये काम केले आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना पत्र लिहून जस्टीस एन. व्ही. रामण्णा हे आंध्र प्रदेश हाय कोर्टाच्या कामकाजात हस्तक्षेप करतात, असा आरोप केल्याने तेव्हा ते विशेष चर्चेमध्ये आले होते.

ANI Tweet

जम्मू कश्मीर मध्ये इंटरनेट सेवेवरील बंदी तात्काळ हटवण्याची मागणी किंवा आरटीआय कायद्याच्या प्रकरणामध्ये रामण्णा यांचा सहभाग होता. आता रामण्णा देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या 'सरन्यायाधीश' या पदावर विराजमान होण्यासाठी सज्ज आहेत.