आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने (Andhra Pradesh High Court) नुकतेच हिंदू मंदिरांमधील कर्मचाऱ्यांबाबत मोठे भाष्य केले आहे. कोर्टाने म्हटले आहे की, जे लोक हिंदू आहेत तेच हिंदू मंदिरात काम करू शकतात. हिंदू मंदिरात दिल्या जाणाऱ्या नोकऱ्या मुस्लिम, ख्रिश्चन किंवा इतर धर्माच्या लोकांना देता येणार नाहीत. एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. अहवालानुसार, पी सुदर्शन बाबू नावाच्या ख्रिश्चन व्यक्तीने आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार, तो ख्रिश्चन असल्यामुळे त्याला श्रीशैलम देवस्थानम बोर्डाच्या नोकरीतून काढून टाकू नये अशी त्याची मागणी होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली.
माहितीनुसार, 2002 मध्ये, आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे व्यवस्थापन करणार्या श्रीशैलम देवस्थानम बोर्डामध्ये ख्रिश्चन (सध्या) असलेल्या पी सुदर्शन यांना अनुकंपा तत्त्वावर रेकॉर्ड असिस्टंट म्हणून नोकरी देण्यात आली होती. मात्र 2002 मध्ये जेव्हा त्यांना नोकरी मिळाली तेव्हा ते 'माला' नावाच्या अनुसूचित जातीचे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही नोकरी मिळाल्यानंतर काही वर्षांनी त्यांनी एका ख्रिश्चन महिलेशी लग्न केले. यानंतर त्यांच्याविरुद्ध आपला खरा ख्रिश्चन धर्म लपवून हिंदू असल्याचे सांगून नोकरी मिळवल्याची तक्रार लोकायुक्तांकडे केली गेली. याबाबत सुदर्शन यांनी लोकायुक्तांना त्यांचे काही जुने कागदपत्र दाखवले ज्यामध्ये त्याच्या अनुसूचित जातीच्या स्थितीबद्दल माहिती नोंदवली गेली होती. मात्र, दुसरीकडे होलीक्रॉस चर्चची कागदपत्रेही लोकायुक्तांसमोर आणण्यात आली. ही सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर आणि इतर सर्व मुद्दे पाहिल्यानंतर सुदर्शनने आपला धर्म लपवल्याचे लोकायुक्तांनी स्पष्ट केले. यामुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले.
पुढे 2012 मध्ये सुदर्शन यांनी नोकरीतून काढून टाकण्याच्या विरोधात आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नोकरी घेताना त्यांनी धर्म लपवला नसल्याचे सांगितले. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. न्यायालयाने नमूद केले की, त्यांनी एका ख्रिश्चन महिलेशी लग्न केले आहे. त्यांनी जर का आपला धर्म न बदलता महिलेशी लग्न केले असते तर ते विशेष विवाह कायद्यांतर्गत आले असते. अशा विवाहासाठी त्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले असते. मात्र सुदर्शनच्या बाबतीत असे घडले नाही. अशा परिस्थितीत स्त्री आणि पुरुष दोघांचा धर्म एकच होता हे स्पष्ट होते.
कोर्टाने असेही म्हटले आहे की, होली क्रॉस चर्चच्या रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावापुढे धर्म म्हणून ‘ख्रिश्चन’ सूचीबद्ध आहे आणि त्यांनी त्यावर स्वाक्षरी केली होती. या परिस्थितीत ते ख्रिश्चन असल्याचे स्पष्ट होते. यामुळे ते श्रीशैलम मंदिरात काम करू शकत नाही, त्यामुळे त्यांनी याचिका फेटाळण्यात आली आहे.