Representational Image | Jawaharlal Nehru University (Photo Credits: ANI)

राजस्थान कोटा येथील सामाजिक कार्यकर्ते सुजित स्वामी यांनी, जेएनयूमध्ये (JNU) शिकणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांबाबत आरटीआय (RTI) दाखल केला होता. आता सुजित स्वामी यांनी याबाबत एक मोठा खुलासा केला आहे, या आरटीआयमध्ये जेएनयूमध्ये शिक्षण घेत असलेल्या 82 विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीयत्वाची माहिती विद्यापीठाच्या व्यवस्थापनाला माहिती नसल्याचे समोर आले आहे.

यामुळे विद्यापीठात शिकणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारताशिवाय 48 देशांतील 301 परदेशी विद्यार्थीही जेएनयूमध्ये शिक्षण घेत आहेत. माहिती अधिकाराखाली परदेशी विद्यार्थ्यांबद्दल त्यांचा तपशील मागितला गेला, त्यास उत्तर म्हणून, जेएनयू प्रशासनाकडून 82 विद्यार्थ्यांच्या देशाबद्दल त्यांना माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

काही प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी सुजितने नुकतेच 5 जानेवारी रोजी जेएनयूमध्ये एक आरटीआय पोस्ट केला होता. जेएनयूमध्ये किती विद्यार्थी शिकत आहेत, कोणत्या कोर्ससाठी किती विद्यार्थी आहेत, किती परदेशी विद्यार्थी आहेत, ते कोणत्या देशातून आले आहेत यासह सुजितने इतर काही प्रश्नांची उत्तरे मागितली होती. त्यानंतर 14 जानेवारी रोजी जेएनयूकडून याचे उत्तर आले, ज्यामध्ये 82 परदेशी विद्यार्थ्यांची माहिती विद्यापीठाला माहित नसल्याचे समोर आले. (हेही वाचा: JNU Student Protest: जेएनयू शुल्कवाढ वाद नेमका काय आहे? विद्यार्थी विरुद्ध जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रशासन का सुरु आहे संघर्ष?)

अशाप्रकारे कधी एनआरसी, कधी सीएए, कधी कलम 370, अशा मोदी सरकारच्या धोरणांच्या निर्णयांवर राजकीय आखाडा बनलेल्या जेएनयूकडे विद्यार्थ्यांचा संपूर्ण डेटाही उपलब्ध नाही. मात्र विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना प्रवेश दिलाच कसा? असा प्रश्न निर्माण होत आहे. याचा संबंध देशाच्या सुरक्षेबाबत लावला जात आहे.

परदेशी विद्यार्थ्यांविषयी बोलायचे झाले, तर जेएनयूमध्ये बहुतेक कोरियाई आणि नेपाळी विद्यार्थी आहेत. कॅम्पसमध्ये एकूण 35 कोरियन आणि 25 नेपाळी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. चीनमधील 24, अफगाणिस्तानचे 21, जपानचे 16, जर्मनीचे 13 विद्यार्थी जेएनयूमध्ये शिकत आहेत. तसेच 10 अमेरिकन विद्यार्थी तर बांगलादेश आणि सिरियाचे प्रत्येकी सात विद्यार्थी विद्यापीठात शिक्षण घेत आहेत.