
Hemant Soren on JMM's win in Jharkhand: 23 डिसेंबर (काल) रोजी झारखंड विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. आश्चर्याची बाब म्हणजे झारखंड राज्यात सत्ताधारी भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आणि या वेळी तिथे झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. निवडणुकीच्या निकालामध्ये मिळालेल्या यशाबद्दल बोलताना झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी एक लक्षवेधी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याबद्दल बोलताना हेमंत सोरेन म्हणाले की शरद पवार यांनी त्यांना जिंकण्याची प्रेरणा दिली आहे.
दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांना मिळालेल्या विजयानंतर त्यांच्यावर देशभरातून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. मुख्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोरेन यांचे ट्विटच्या माध्यमातून अभिनंदन केले. मात्र शरद पवार यांच्या या ट्विटला उत्तर देताना सोरेन यांनी त्यांचेच आभार मानले आहे.
पवारांना उत्तर देताना ते लिहितात, "शरद पवार यांनी महाराष्ट्रात केलेल्या संघर्षामुळे आम्हाला झारखंडमध्ये भाजपविरोधात लढण्याची प्रेरणा मिळाली आहे."
तसेच पवारांनी आपल्या ट्विटमध्ये झारखंडच्या विजयाने भाजपला पराभूत करण्यासाठीच्या नव्या समीकरणांचा उल्लेख देखील केला आहे. तसेच काल झारखंडच्या निकालानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राने दाखवलेल्या मार्गाचा अवलंब झारखंडने केला असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, येत्या 27 डिसेंबर रोजी झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपदासह 5 मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.