Medical Workers (Photo Credits: IANS)

देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) शिरकाव केल्यापासून अनेक रुग्णालयांमध्ये प्लाझ्मा थेरपीचा (Plasma Therapy) वापर केला जात आहे. कोरोना महामारीच्या दरम्यान, लोकांना प्लाझ्मा दान करण्याबद्दल खूप जागरूक केले जात आहे. परंतु आता डॉक्टर, सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि आरोग्य तज्ञांच्या गटाने एम्स प्रमुख व आयसीएमआर (ICMR) प्रमुख यांना पत्र लिहून कोविड उपचारामधील प्लाझ्माच्या वापरावर चिंता व्यक्त केली आहे. प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. विजय राघवन यांना हे पत्र लिहिले गेले आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, देशातील कोरोना उपचारांमध्ये प्लाझ्माचा अतार्किक आणि अवैज्ञानिक उपयोग केला जात आहे व ही चिंतेची बाब आहे.

कोविड-19 चे हजारो रुग्ण आणि त्यांच्या कुटूंबियांना प्लाझ्माचा वापर थांबविण्यासाठी तज्ञांनी त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पत्रात विविध अहवालांचा हवाला देताना वैज्ञानिक आणि आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे की, ‘कोविडच्या उपचारात प्लाझ्माचा कोणताही फायदा होत नाही असे सध्याचे संशोधन दर्शवते.’ तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे की, प्लाझ्मा डोनर आणि ते घेणारे लोक अनावश्यक अडचणीत येत आहेत. एवढेच नव्हे तर देशभरात प्लाझ्मा बँका देखील बांधल्या जात आहेत. तज्ञांनी सांगितले की, प्लाझ्मा थेरपीमुळे मृत्यूच्या संख्येत कोणतीही घट झाली नाही, तसेच या थेरपीमुळे आणखी नुकसान पोहचू शकते व त्यामुळे संक्रमणाचा धोकाही वाढू शकतो.’

असे आढळले आहे की, गंभीर कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी किंवा मृत्यूची जोखीम कमी करण्यात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही. प्लाझ्मा थेरपीमध्ये, कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून एंटीबॉडीज काढल्या जातात व त्या संक्रमित व्यक्तीला दिल्या जातात. आयसीएमआरने याबाबत देशातील 39 रुग्णालयांमध्ये पहिली चाचणी घेतली होती. त्यामध्ये प्लाझ्मा थेअरीचा गंभीर कोरोना रुग्णांवर किंवा मृत्यूच्या जोखमीवर कोणताही परिणाम झाला नाही असे आढळले. (हेही वाचा: भारतामधील कोरोना विषाणू व्हेरिएंट तब्बल 44 देशांमध्ये पसरला; WHO ने व्यक्त केली चिंता)

दरम्यान, आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने बुधवारी झालेल्या बैठकीत म्हटले आहे की, लवकरच देशातील प्लाझ्मा थेरपीच्या वापराविषयी चर्चा केली जाणार आहे. यामध्ये ही उपचार पद्धत्ती वापरायचे का नाही याबाबत निर्णय घेतला जाईल.