Petrol, Diesel Prices Today | (Photo credit - File Manager)

पेट्रोलियम कंपन्यांनी सलग 5 महिने इंधनाच्या दरात वाढ न केल्याने तेल कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढत असतानाही इंधनाच्या किमती न वाढल्यामुळे नोव्हेंबर ते मार्च 2022 पर्यंत देशातील टॉप-3 पेट्रोलियम कंपन्यांना 2.25 अब्ज डॉलर्स (सुमारे 19,000 कोटी रुपये) तोटा झाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) यांना इंधनाच्या किमती न वाढवल्यामुळे हे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे, असे मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने गुरुवारी एका अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊनही 4 नोव्हेंबर 2021 ते 21 मार्च 2022 दरम्यान देशात इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. यावेळी, कच्च्या तेलाची किंमत नोव्हेंबरमध्ये प्रति बॅरल 82 डॉलरवरून मार्चच्या पहिल्या तीन आठवड्यात सरासरी 111 डॉलर प्रति बॅरल होती. (हेही वाचा - PNG-CNG Price Hike: पेट्रोल आणि डिझेलनंतर आता पीएनजी-सीएनजीच्या किंमतीतही वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर?)

याशिवाय पेट्रोलियम तेल कंपन्यांनी 22 आणि 23 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 ते 80 पैशांनी वाढ केली आहे. गुरुवारी इंधनाच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. मूडीजने आपल्या अहवालात म्हटले आहे की, 'सध्याच्या बाजारभावांच्या आधारे, पेट्रोलियम विपणन कंपन्यांना सध्या पेट्रोलच्या विक्रीवर प्रति बॅरल सुमारे 25 डॉलर (रु. 1,900 पेक्षा जास्त) आणि डिझेलवर प्रति बॅरल 24 डॉलर इतका तोटा सहन करावा लागत आहे.

अहवालात म्हटले आहे की, जर क्रूड तेलाच्या किमती सरासरी 111 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास राहिल्या, आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांना एकत्रितपणे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर दररोज 65 ते 70 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होऊ शकते.