Indian Railways: आता ट्रेनमध्ये मिळेल तुमच्या आवडीचे खाणे; भारतीय रेल्वेने पुन्हा सुरु केली E-Catering सर्व्हिस
Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या आजारामुळे भारतीय रेल्वे (Indian Railway) गाड्यांमध्ये बंद असलेली इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिस्ट कॉर्पोरेशन (IRCTC) ची ई-केटरिंग (E-Catering) सुविधा पुन्हा सुरू होणार आहे. भारतीय रेल्वेने यासाठी आयआरसीटीसीला परवानगी दिली आहे. मात्र, सध्या काही निवडक स्थानकांवर रेल्वेची ई-केटरिंग सुविधा पुन्हा सुरू केली जाईल. यावेळी केंद्र आणि संबंधित राज्य सरकारांच्या आरोग्याशी संबंधित सर्व नियमांचे पालन केले जाईल. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार एसी बोगीमध्ये गाड्या, ब्लँकेट, उशा आणि चादरी पुरवणे बंद केले होते, परंतु आता भारतीय रेल्वेने ट्रेनमध्ये ई-केटरिंग सेवा पुनरुज्जीवित केल्या आहेत.

आयआरसीटीसीच्या या सुविधेद्वारे प्रवासी आपल्या आवडीच्या रेस्टॉरंटमधून ऑनलाइन ऑर्डर करू शकतात. ऑर्डर करताना प्रवाशांना कोणत्या स्टेशनवर आणि कोणत्या वेळी त्यांचे भोजन येईल याबद्दल सांगितले जाईल. खाण्यासाठी प्रवाशांना कुठेही जाण्याची गरज नाही. आयआरसीटीसीने काही रेल्वे स्थानकांवर ई-केटरिंग सेवा सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाकडे परवानगी मागितली होती, जी रेल्वे मंत्रालयाने मान्य केली आहे. आयआरसीटीसी जानेवारी 2021 च्या शेवटच्या आठवड्यापासून ही सेवा ऑपरेट करणार आहे. भारतीय रेल्वेने ट्विटद्वारे या प्रकरणाची माहिती दिली.

यासाठी कंपनीने ऑपरेशन दरम्यान, रेस्टॉरंटची स्वच्छता, डिलिव्हरी बॉयचे थर्मल स्कॅनिंग, स्वयंपाकघराची स्वच्छता, डिलिव्हरी कर्मचार्‍यांकडून संरक्षणात्मक फेस मास्क किंवा फेस शील्डचा वापर करणे, जेव्हा शरीराचे तापमान 99 डिग्री F पेक्षा कमी असेल तेव्हाच अन्न तयार करणे, अशा काही कडक मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. (हेही वाचा: Fact Check: ट्रेनने प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून वसूल केले जातायत अधिक पैसे? रेल्वेने दिले स्पष्टीकरण)

डिलिव्हरी बॉयसाठीही काही सूचना दिल्या आहेत. यामध्ये हात धुण्यानंतर ऑर्डर घेणे, डिलिव्हरी कर्मचार्‍यांकडून 'आरोग्य सेतु' अ‍ॅपचा अनिवार्य वापर, मानवी संपर्क टाळणे सुनिश्चित करण्यासाठी संपर्क रहित वितरण, डिलिव्हरीनंतर डिलिव्हरीच्या पिशव्या स्वच्छ करणे या काही गोष्टी समाविष्ट आहेत.