Indian Railways Data Breach: भारतीय रेल्वेचा डेटा लीक झाल्याचा दावा; 3 कोटी वापरकर्त्यांची माहिती ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

एम्सनंतर आता ऑनलाइन चोरट्यांनी भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) वेबसाइटवर डल्ला मारला आहे. भारतीय रेल्वेच्या सुमारे 3 कोटी युजर्सचा डेटा लीक झाल्याचा दावा (Data Breach) करण्यात आला आहे. सध्या हॅकरची ओळख पटलेली नाही, मात्र 27 डिसेंबरला या युजर्सचा डेटा हॅकर फोरमवर विकला जात असल्याची माहिती समोर आली आहे. डेटा विक्रेत्याने फोरमवर शॅडोहॅकरच्या (Shadowhacker) नावाने माहिती टाकली आहे.

मनीकंट्रोलच्या एका बातमीनुसार, हॅकर्सने लीक केलेल्या माहितीमध्ये वापरकर्त्याचे नाव, मोबाइल नंबर, लिंग, पत्ता, शहर, भाषा, प्रवास तपशील, इनव्हॉइस पीडीए यासह अनेक वैयक्तिक माहिती समाविष्ट आहे. हॅकरने दावा केला आहे की, या माहितीमध्ये अनेक सरकारी ई-मेल आयडी समाविष्ट आहेत, जे ऑनलाइन विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. सुरक्षा संशोधक अद्याप या डेटाची सत्यता किंवा ते परत मिळविण्याच्या पद्धतींबद्दल माहिती गोळा करू शकले नाहीत.

यासह भारतीय रेल्वेकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. शॅडोहॅकर त्याच्याकडील डेटाच्या 5 प्रती $400 (सुमारे 35,000 रुपये) मध्ये विकण्याची ऑफर देत आहे. यासह जर एखाद्याला एक्सक्लुझिव्ह ऍक्सेस हवा असेल तर त्याला $1,500 (सुमारे 1.25 लाख रुपये) द्यावे लागतील. एवढेच नाही तर काही विशिष्ट माहिती डेटासोबत शेअर करण्याच्या बदल्यात हॅकरने 2 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.60 लाख रुपये मागितले आहेत. (हेही वाचा: भारतामध्ये लवकरच लॉन्च होणार BSNL कडून 5जी सेवा- मंत्री Ashwini Vaishnaw यांची माहिती)

हॅकरने त्या कमकुवत लिंक्सचा पर्दाफाश करण्याचाही प्रस्ताव दिला आहे, ज्याचा तो वेबसाइटवर वापर करतो. मात्र, ही वेबसाइट आयआरसीटीसीचे तिकीट बुकिंग पोर्टल आहे की भारतीय रेल्वेची वेबसाइट आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या रेल्वेच्या ३ कोटी युजर्सची वैयक्तिक माहिती लीक होण्याचा धोका आहे. दरम्यान, विशेष म्हणजे, या महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीतील एम्स रुग्णालयाची वेबसाइट हॅक करण्यात आली होती आणि हॅकर्सनी कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.