Rahul Gandhi | (Photo Credit- X)

इंडिया आघाडीला (INDIA Bloc) मिळालेले यश केवळ काँग्रेस (Congress) पक्ष किंवा इंडिया आघाडीला मिळालेले यश नव्हे तर ते राज्यघटना वाचविण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आहे, अशी भावना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी व्यक्त केली आहे. भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडीला मिळालेल्या यशानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी बोलताना ते म्हणाले, इंडिया आघाडी सत्तेत असावी की विरोधात याबाबत आज तरी आमच्याकडे उत्तर नाही. आम्ही आगोदरच निश्चित केल्याप्रमाणे 5 जून रोजी एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष मिळून निर्णय घेतील. त्यामुळे सत्ता की विरोधी पक्षाची भूमिका या प्रश्नाचे उत्तर उद्या मिळू शकते.

देशातील जनतेचा काँग्रेस आघाडीला पाठिंबा

राहुल गांधी पुढे म्हणाले, ही निवडणूक काँग्रेस आणि महाविकासआघाडी केवळ सत्तेसाठी लढली नव्हती, तर सत्ताधारी पक्ष आणि सरकारद्वारा देशाच्या राज्यघटनेवर जो हल्ला केला जात होता, त्याविरोधात लढविण्यात आली होती. नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारद्वारे सातत्याने राज्यघटनेवर हल्ले चढवले, विरोधकांवर हल्ले चढवले, दलित, मजूर आणि मागास लोकांवर प्रचंड हल्ले केले. मात्र, आम्ही या सर्व कारवायांच्या विरोधात उभे राहिलो. केवळ काँग्रेस पार्टी नव्हे तर महाविकासआघाडीतील अनेक घटक पक्ष मोदी सरकारच्या विरोधात लढले. त्याला भारतातील नागरिक, मतदारांनीसुद्धा चांगले सहकार्य केले. आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला अधिक जागांवर निवडून दिले. (हेही वाचा, Indian General Election Results 2024: 'बच्चा अभी बडा हो गया'; रोहित पवार यांचा विरोधकांना टोला)

'जनतेने नरेंद्र मोदी आणि आदानींना नाकारले'

इंडिया आघाडीला जे यश मिळाले ते यश म्हणजे देशातील जनतेने मतदानाच्या रुपात नरेंद्र मोदी यांच्या रुपात असलेल्या आदानींना नाकारले आहे. तुम्ही आदानीचे शेअर बाजारातील शेअर्स पाहा. लोकांना वाटते मोदी गेले तर आदानीही जाईल, म्हणूनच त्याचे प्रचंड पर्यावसन शेअर बाजारात दिसते, असेही राहुल गांधी म्हणाले. (हेही वाचा, Indian General Election Results 2024: सुप्रिया सुळे यांचा विजय ते नितीश कुमार यांच्याशी चर्चा; शरद पवार स्पष्टच बोलले)

व्हिडिओ

काँग्रेस आणि इंडिया आघाडीला देशभरात मिळालेले यश हे अधिक प्रतिकूल परिस्थितीत मिळाले आहे. त्यामुळे ते अधिक महत्त्वाचे ठरते. देशभरामध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडत असताना सत्ताधारी पक्षाने सरकारी यंत्रणा हाताशी धरुण आमच्या मार्गात अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये विरोधी पक्षाला संसाधने उपलब्ध होऊ न देणे, विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स यांद्वारे कारवाया करण्यात आल्या. पदाधीकारी, कार्यकर्त्यांवरही दबाव टाकण्यात आला. असे असले तरी सर्व आव्हानांना सामोरे जात इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी चांगले यश मिळवले, त्यामुळे त्यांचे आभारच मानायला हवेत, असे मल्लिकार्जून खडगे म्हणाले.